विश्वजित कदमांच्या संग्राम देशमुखांना सदिच्छा !

 

सांगली: : वृत्तसंस्था । पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदानानिमित्त कडेगाव (जि. सांगली) येथे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे एकत्र आले. देशमुख स्वतःहून भेटीसाठी आल्यानंतर मंत्री कदम यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील प्रमुख दोन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातील असल्याने सकाळपासूनच जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे. भिलवडी येथील कार्यकर्त्यांच्या गोंधळाचा अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे.

पुणे पदवीधर मतदार संघात भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्यात चुरशीची लढत होत आहे. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने मतविभागणीचा फटका प्रमुख उमेदवारांना बसण्याचा धोका वाढला आहे. यामुळे उमेदवारांकडून जुळवाजुळवीसाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

मंगळवारी सकाळी संग्राम देशमुख यांनी कडेगाव येथे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची भेट घेतली. मतदान केल्यानंतर मंत्री कदम हे मतदान केंद्रापासून जवळच असलेल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. यानंतर काही वेळातच संग्राम देशमुख मतदान करण्यासाठी पोचले. मंत्री कदम हे जवळच असल्याची माहिती मिळताच ते भेटीसाठी गेले. या भेटीत मंत्री कदम यांनी भाजपच्या उमेदवारास शुभेच्छा दिल्या. या भेटीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असून, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड या दोघांनीही मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Protected Content