रेल्वे फाटक ओलांडताना रेल्वेने धडक दिल्याने वृध्द ठार

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमरावती जिल्हयात तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथे मुलीकडे मुक्काम करून आपल्या गावी परत जात असताना एका वृद्ध व्यक्तीचा रेल्वे फाटक ओलांडताना रेल्वेगाडीला धडकल्याने अपघाती मृत्यू झाला. किसन रामचंद्र कावडे (वय ८०) असे मृत वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान फाटकाजवळ उपस्थितांनी आरडाओरड केल्यामुळे या वृद्धाची पत्नी बचावली.

चार दिवसांपूर्वी ८ एप्रिल रोजी आपल्या म्हाताऱ्या पत्नीला घेऊन किसन रामचंद्र कावळे (रा. सायखेड ता. घाटंजी जिल्हा यवतमाळ) हे सासरी असलेल्या मुली व तिच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील जावाई शंकर शेंडे यांच्याकडे गेले होते.दरम्यान आपल्या पत्नीचा भाऊ अमरावती येथे राहतो, म्हणून हे दोघेही अमरावती येथील नातलगांना सुद्धा भेटून आले. मागील दोन दिवस त्यांनी कुऱ्हा येथे जावाई शंकर शेंडे यांच्याकडे मुक्काम केला. दरम्यान शनिवारी (ता.१३) घर जवळ करावे म्हणून आपल्या गावी सायखेड येथे जाण्यासाठी हे दोघेही कुऱ्हा येथून निघाले.

नातवाने सकाळी साडेदहाच्या दरम्यान या दोघांना धामणगाव जाणाऱ्या वाहनात बसवून दिले. शहरात उतरून दोघेही यवतमाळ जाण्यासाठी बसस्थानकाकडे निघाले असता त्यांना रेल्वे फाटक बंद असल्याचे आढळले. तरीसुद्धा इतर लोक रेल्वे फाटक ओलांडून जात असल्याचे पाहून या वयोवृद्ध दाम्पत्याने सुद्धा रेल्वे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न केला.

इतक्यात अचानक नागपूरकडे जाणारी मालगाडी येत होती व समोर पाऊल टाकताच मुंबईच्या दिशेने जाणारी सुपरफास्ट रेल्वेगाडी सुद्धा झपाट्याने धावून आली, त्यामुळे दोघेही घाबरले. दरम्यान, उपस्थितांनी आरडाओरड केली. सोबत असलेली म्हातारी मागे सरकली त्यामुळे तिचा जीव वाचला. मात्र अचानक वेगाने आलेल्या रेल्वेगाडीच्या जबरदस्त धडकेत किसन रामचंद्र कावळे या वयोवृद्ध इसमाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. उत्तरीय तपासणीनंतर किसन कावळे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. किसन कावळे यांना पत्नी तीन मुली, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Protected Content