जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महाबळ परिसरात राहणाऱ्या विवाहितेला पतीकडून दारूच्या नशेत कारण नसतांना मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी ११ मार्च रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील महाबळ परिसरातील दिपाली धनराज निंबाळे यांचा विवाह धनराज शांतराम निंबाळे यांच्या सोबत मे २००६ मध्ये झालेला आहे. दरम्यान पती धनराज निंबाळे याला दारू पिण्याचे व्यसन आहे. लग्न झाल्यापासून विवाहितेला दारूच्या नशेत येवून घरातील किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच विवाहितेच्या आईवडीलांना देखील जीवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच विवाहिता माहेरी असतांना तिथे देखील मारहाण करत होता. हा छळ सहन न झाल्याने अखेर शनिवारी ११ मार्च रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती धनराज शांतराम निंबाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.