जळगाव, प्रतिनिधी | जोडीदाराचे विचार सारखे पाहिजे अशी भूमिका न ठेवता विवाहेच्छूक युवक-युवतींनी लवचिकता ठेवली पाहिजे. त्यात तडजोड आनंदाने स्विकारता आली नाही तर मग, ‘मला सहन करावे लागेल’ असे म्हटले जाते. तडजोडीत स्वीकार असणे महत्त्वाचे आहे. तरच पुढील काळातील घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल. लग्नापूर्वी विवाह समुपदेशन आणि आपल्या अपेक्षांवर मुलामुलींसह पालकांनीदेखील संवाद केला पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री खा.डॉ.विकास महात्मे यांनी केले.
‘मांगल्य’ वधू-वर सूचक व संकलन केंद्राचे संचालक प्रभाकर न्हाळदे, संचालिका रेखा न्हाळदे यांच्या संयोजनातून केंद्रातर्फे शहरात व.वा. वाचनालय येथे रविवार दि. २६ डिसेंबर रोजी २६ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. मेळाव्यामध्ये राज्यसभा सदस्य पद्मश्री खा.डॉ.विकास महात्मे अध्यक्षस्थानी होते. तर आ.सुरेश भोळे, सेवानिवृत्त डीवायएसपी केशव पातोंड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, सामजिक कार्यकर्ते रघुनाथ सोनवणे, रामेश्वर पाटील, सुभाष सोनवणे, अमरावती येथील राहुल थेटे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन झाले. दिपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रस्तावनामध्ये रेखा न्हाळदे यांनी कार्यक्रमामागील उद्देश सांगत वधू-वर परिचय मेळावाविषयी माहिती दिली. यानंतर वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यामध्ये धनगर समाजातील सर्व पोटजातींच्या मुलामुलींनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून परिचय दिला. यावेळी वधू-वर केंद्राच्या माध्यमातून २२ युवक-युवतींचे विवाह जुळले. युवक व युवतींनी त्यांचा परिचय देऊन त्यांच्या अपेक्षा व त्यांच्याविषयी माहिती दिली. मेळाव्यात १५० विवाहेच्छूक युवक-युवतींनी परिचय करून दिला.
आ.सुरेश भोळे यांनी, आजच्या तरुणांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असे सांगत वधू-वर सूचक मेळाव्याला सदिच्छा दिल्या. समाजाचे दोन ऋण असतात. समाजाप्रती आणि राष्ट्रप्रति असलेले ऋण महत्वाचे आहे. महापुरुषांच्या विचारांची उजळणी आपण केली पाहिजे. नियोजित वधू-वरांनी, अपेक्षा बाळगताना तडजोड देखील केले पाहिजे. विवाहानंतरचे वाद टाळण्यासाठी आधीच संवाद होणे गरजेचे असून सासू-सुनांचा एकमेकांशी होत असलेला दुजाभाव संपला पाहिजे, असेही आ. भोळे म्हणाले. सुभाष सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त करताना धनगर समाजाची सद्यस्थिती मांडली.
अध्यक्षस्थानावरून पद्मश्री खा.डॉ. महात्मे म्हणाले की, आजच्या काळात जीवनपध्दती बदलली आहे. एकमेकांशी जुळवून घेणे, कुटुंबात टीम म्हणून काम करणे असे होत नाही त्यामुळे समाजात घटस्फोट वाढत आहे. वेळ घ्या, पण मुलामुलींनी एकमेकांशी संवाद साधावा असे सांगितले. धनगर समाजाला आरक्षण मिळणे काळाची गरज आहे. त्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे, असेही ते म्हणाले.
सूत्रसंचालन धर्मा सोनवणे, अशोक पारधी यांनी तर आभार गणेश बागूल यांनी मानले. मेळाव्यासाठी रामचंद्र च-हाटे, सुभाष करे, महेंद्र सोनवणे, अरुण ठाकरे, दिलीप धनगर, प्रवीण पवार, सुनील खोमणे, डॉ.संजय पाटील, दिगंबर धनगर, संदीप मनोरे, संदीप तेले, हिलाल सोनवणे यांच्यासह धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/618627092728624