सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे उध्दव ठाकरेंच्या हस्ते अनावरण ( व्हिडीओ )

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.

जळगाव महापालिकेने महापालिका इमारतीच्या आवारात देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात यावा असा ठराव संमत केला होता. या अनुषंगाने आमदार राजूमामा भोळे यांनी हा पुतळा गेल्या महिन्यात महापालिका प्रशासनाला सुपुर्द केला होता. या पुतळ्याचे सरदार पटेल जयंतीला अर्थात ३१ ऑक्टोबर रोजी अनावरण करण्यात यावे, तसेच यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांना आमंत्रीत करण्यात यावे अशी भूमिका आमदार राजूमामा भोळे यांनी घेतली होती. तर, महापौर आणि उपमहापौरांनी या पंचवार्षिकचा कार्यकाळ संपण्याआधीच याला उध्दव ठाकरे यांच्याहस्ते अनावरण करण्यात यावे अशी भूमिका घेतली. यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला.

गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात मोठा पेच सुरू होता. अगदी राज्याच्या नगरविकास खात्याने या कार्यक्रमाला स्थगिती देण्याचे पत्र जारी केले तरी महापौर व उपमहापौरांनी हा कार्यक्रम घेणारच असल्याची भूमिका घेतली. अगदी कालपर्यंत दोन्ही बाजूंमध्ये दावे-प्रतिदावे सुरू होते. मात्र रात्री आमदार राजूमामा भोळे यांनी महापौरांनी सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षीत असतांनाही तसे न केल्याबद्दल खंत व्यक्त करत या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यामुळे अर्थातच कार्यक्रमाचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, आज सकाळी अकराच्या सुमारास उध्दव ठाकरे यांचे जळगाव महापालिकेच्या आवारात आगमन झाले असता त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्याहस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत, राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेशदादा पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, समाधान महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, पाचोरा येथील वैशालीताई सूर्यवंशी, महानंदाताई पाटील, गायत्री सोनवणे, गजानन मालपुरे, माजी महापौर नितीन लढ्ढा, प्रशांत सुरळकर, विराज कावडिया आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना खासदार संजय राऊत यांनी सरदार पटेल यांनी आधीची भाजप अर्थात संघावर टिका केली असल्याचा दाखल दिला. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उदघाटनाला महाराष्ट्राचे सरदार आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर, उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात जळगावातील शिवसैनिक हे कट्टर आणि कडवट असल्याचे सांगत संघर्षातून वाटचाल करत आगामी काळात आपण लढा देणार असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर जयश्रीताई महाजन यांनी तर आभार प्रदर्शन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले.

खालील व्हिडीओजमध्ये पहा लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा

Protected Content

%d bloggers like this: