विरोधकांमध्ये शहाणपण उरले आहे का ? : शिवसेनेचा सवाल

मुंबई प्रतिनिधी । पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे-बोलावे. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण विरोधकांत शहाणपण उरले आहे काय? असा खडा सवाल करत आज शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज भाजपतर्फे सरकार विरोधात आंदोनल केले जात आहे. या पार्श्‍वभूमिवर, शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील अग्रलेखात भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, सारा देश कोरोनाविरुद्ध लढ्यात झोकून देऊन काम करीत असताना महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला फालतू आंदोलनाचे डोहाळे लागले आहेत. प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फतवा काढला आहे की, राज्यातील जनतेने शुक्रवारी आपापल्या घराबाहेर पडावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा. चंद्रकांत पाटील व इतर अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचे केस साफ पांढरे होऊन त्यांची चांदी झाली आहे. मग आता त्या केसांना काळा कलप लावून ते अंगणातील रणांगणात उतरणार काय? कारण महाराष्ट्र भाजपचा आदेश आहे की सर्वच काळे करा. हा सर्वच प्रकार म्हणजे येडयांची जत्रा आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, राज्यपालांच्या अंगणात लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्‍न घेऊन विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा केली पाहिजे. राज्याच्या प्रश्‍नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटत आहे की त्यांनी आत्मविश्‍वास गमावला आहे? महाराष्ट्रात कोरोना लढाईत सगळेच काम करीत आहेत. रुग्ण वाढत आहेत तसे रुग्ण कोरोनामुक्तही होत आहेत. आतापर्यंत दहा हजार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद आहे हे कसले लक्षण आहे? कोरोना योद्धयांवर अविश्‍वास दाखवून भाजपला काय साध्य करायचे आहे? यात पुढे नमूद केले आहे की, पाटील-फडणवीस मंडळींनी महाराष्ट्रासंदर्भात जे प्रश्‍न निर्माण केले आहेत ते सर्व केंद्राशी संबंधित आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक करावे ते म्हणजे सर्वपक्षीय शिष्टमंडळ विरोधी पक्षनेत्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीस पाठवावे व त्यांच्या हाती दिल्लीहून मंजूर करून घ्यायची कामाची यादी सोपवावी. महाराष्ट्राची चिंता करणार्‍या पाटील-फडणवीसांनी ही सर्व कामे व योजना, महाराष्ट्राच्या वाट्याचे पाच-पन्नास हजार कोटी रुपये घेऊन यावेत. महाराष्ट्राची मालकी कुणा एका-दोघा पक्षांची नाही. हाराष्ट्रात काळतोंडे आंदोलन करण्यापेक्षा हे विधायक काम बरे. महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य काळे करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही. पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे-बोलावे. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण विरोधकांत शहाणपण उरले आहे काय? असा प्रश्‍न यात विचारण्यात आला आहे.

Protected Content