विनोद अहिरे लिखित ‘हुंकार वेदनेचा’ कवितासंग्रहाचा रविवारी प्रकाशन सोहळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे उद्या रविवार दि. १२ जून रोजी कवी विनोद अहिरे लिखित ‘हुंकार वेदनेचा’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या  सोहळाच्या अध्यक्षपदी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे असणार आहेत.

 

जिल्हा पोलीस दलातील कवी विनोद अहिरे लिखित ‘हुंकार वेदनेचा’ कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे असणार आहेत. काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक, विचारवंत संजय आवटे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, साहित्यिक व कवी डॉ. मिलिंद बागूल, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र टाले, ठाणे येथील रियाज अली सय्यद, नांदेड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर, अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सपकाळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात जिल्हा पत्रकार संघाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. गोपी सोरडे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. विनोद अहिरे यांचा यापूर्वीदेखील ‘मृत्यू घराचा पहारा’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून, ते प्रचंड गाजलेले आहे. त्याचबरोबर विविध विषयांवर ते स्तंभलेखन करीत असतात. कार्यक्रमाला साहित्यप्रेमींना उपस्थितीचे आवाहन सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content