मुंबई : प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकतेचा विषय बनलेली विधान परिषदेसाठी 12 सदस्यांच्या नावांची यादी अखेर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज सायंकाळी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन महा विकास आघाडीतर्फे बारा उमेदवारांच्या नावांची यादी राज्यपालांना सुपूर्द केली. यात नेमकी कुणाची नावे आहेत याविषयी प्रचंड गोपनीयता पाळण्यात येत असली तरी कायदेशीर पूर्तता करून महाविकास आघाडीने ही यादी राज्यपालांना सोपविण्यात आल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.
यावेळी त्यांच्यासोबत नवाब मलिक हे देखील उपस्थित होते. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजपमधून नुकतेच पक्षात आलेले मातब्बर नेते एकनाथराव खडसे यांना संधी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांना संधी मिळणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसतर्फे रजनी पाटील, सचिन सावंत, मुजफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध बनकर यांना आमदारकी मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. शिवसेनेतर्फे देखील अनेक दावेदार असले तरी यात नेमकी कुणाची नावे आहेत याबाबत मात्र अद्याप माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.