जळगाव : प्रतिनिधी । विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणींबाबत आज विविध विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भेट घेवून चर्चा केली.
यावेळी उपमहापौर श्री. पाटील यांनी त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच काही महाविद्यालये विविध शुल्क आकारणी करत आहेत. यात संगणक वापरले नसतांना फी आकारली जात असल्याबद्दल काही विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकारी यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची त्यांच्या दालनात भेट घेवून अवगत केले. काही महाविद्यालये अभ्यास दौरा आयोजित न करता दौऱ्याची फी प्रवेशावेळीच घेत असल्याचे व इतर अडचणी मांडल्या.
याप्रसंगी उपमहापौर श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्यासाठी कुलगुरू, संबधित महाविद्यालये व सम्बन्धित अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे स्पष्ट केले. या शिष्टमंडळात सत्यशोधक विद्यार्थी संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवासेना, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, सम्यक विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र युनियन पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.