विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना एनडीआरएफच्या तज्ज्ञांकडून मिळणा-या प्रशिक्षणाचा फायदा समाजाला होणार असून भविष्यात आपत्ती आली तर उद्भवणा-या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी ही युवा शक्ती सज्ज राहील, असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आज सोमवार दि. १९ डिसेंबर पासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन समारंभात श्री. कोश्यारी यांनी दुरदृश्य प्रणालीव्दारे मार्गदर्शन केले.

यावेळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वानंजे, एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर, आव्हान शिबिराच्या निरीक्षण समितीचे सदस्य तथा एसएनडीटी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. नितीन तेंडूलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या भाषणात म्हणाले की, अध्ययन आणि अध्यापनाच्या पुस्तकी शिक्षणा पलीकडे तरूण पिढीत सामाजिक भान निर्माण व्हावे व सामाजिक प्रश्न कळावेत म्हणून एनएसएस आणि एनसीसीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडते. कोविड काळात रासेयो च्या विद्यार्थ्यांनी उत्तम काम केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या या प्रशिक्षण शिबिरात एनडीआरएफच्या माध्यामातून या विद्यार्थ्यांना तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळणार आहे. आपत्तीच्या काळात केवळ सरकारवर अवंलबून चालणार नाही तर समाजातील अनेक घटकांना जोडावे लागते त्यातून या संकटाचा मुकाबला करता येतो. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यात आपत्तीमध्ये अनेक गावे नष्ट झालीत. केंद्र सरकारने आपत्तीचे महत्त्व लक्षात घेवून एनडीआरएफ गठीत केले. दहा दिवसात एनडीआरएफ कडून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा रासेयोच्या विद्यार्थ्यांना होणार असून भविष्यात आपत्तीच्या घटना घडल्या तर त्यांना सामोरे कसे जावे याचे प्रशिक्षण मिळणार आहे त्यामुळे आपत्तीचा प्रभाव कमी होईल यासोबतच तरूण पिढीत राष्ट्रभाव आणि मानवसेवा हे गुण वाढीला लागतील असा विश्वास व्यक्त करून श्री. कोश्यारी यांनी या प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी पुढे गावातील लोकांनाही प्रशिक्षण द्यावे असे आवाहन केले.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी आपल्या भाषणात आपत्ती व्यवस्थापनाकडे गांभिर्याने आणि संघटीतपणे बघण्याचे गरज असल्याचे सांगितले. सेवा आणि त्याग याचे महत्व सांगत असतांना सामाजिक भान असलेली पिढी रा.से.यो.च्या माध्यमातून गेल्या ५० वर्षापासून घडते आहे असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाची ओळख उपस्थितांना करून दिली.

प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी प्रास्ताविक केले. या शिबिरात २० विद्यापीठांमधील ५२९ विद्यार्थी, ३२७ विद्यार्थिंनी, ३४ पुरूष संघ व्यवस्थापक व १८ महिला संघ व्यवस्थापक सहभागी झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. कुलगुरूंचे प्रतिनिधी प्रा. राम भावसार यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे राजभवनात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आशुतोष पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. मुख्य कार्यक्रमाच्या आधी प्रशासकीय इमारतीसमोर रासेयो ध्वजाचे रोहन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यक्रमात मंचावर अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्राचार्य आर. एस. पाटील, प्राचार्य प्रमोद पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, वित्त व लेखाधिकारी रवींद्र पाटील, रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे, आव्हानचे समन्वयक प्रा. किशोर पवार, रासेयोचे जिल्हा समन्वयक डॉ. मनीष करंजे, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. विजय पाटील हे उपस्थित होते.

 

Protected Content