विदेशी फेसबुक मित्राने मुंबईतील महिलेला १० लाखात गंडवले !

 

मुंबई : वृत्तसंस्था । फेसबुकद्वारे मुंबईतील ५३ वर्षीय महिलेशी मैत्री करून तिच्याकडून साडेदहा लाख रुपये लुटणाऱ्या नायजेरियन नागरिक असलेल्या सायबर भामटय़ासह आणखी एका महिलेला बोरिवली पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.

 

या भामटय़ाने परदेशातून तीन कोटी रुपयांचे पार्सल पाठविल्याचा बहाणा केला. पार्सल दिल्ली विमानतळावर सीमा शुल्क विभागाने अडविल्याचे सांगून या महिलेकडून विविध कारणांसाठी पैसे काढून घेतले होते. प्रिन्स इफांयी मदुकासी (३०) आणि हेयो मेयिंग (२२) अशी या भामटय़ांची नावे आहेत.

 

तक्रारदार महिलेला गेल्यावर्षी मार्क या नावाने फेसबुक खात्यावरून ‘मित्र विनंती’ आली होती. त्यांनतर त्यांच्यात संवाद सुरू झाला. भारतात व्यवसाय करण्यासाठी तीन कोटी रुपयांचे एक पार्सल पाठविल्याचे या भामटय़ाने महिलेला सांगितले.

 

काही दिवसांनी दिल्ली विमानतळावरील सीमाशुल्क विभागातून सुनीता शर्मा नावाने अधिकारी बोलत असल्याची ओळख सांगणारा फोन महिलेला आला. तक्रारदार महिलेचा या तोतया अधिकारी महिलेवर विश्वास बसला. सुनीताने सुरुवातीला या महिलेला सीमा शुल्कापोटी दीड लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर मनी लाँड्रिंग शुल्क, पार्सल हस्तांतर शुल्क अशा विविध बहाण्यांनी भामटय़ाने या महिलेकडून आणखी पैसे उकळले. तक्रारदार महिलेने स्वत:चे दागिने गहाण ठेवून आरोपींना पैसे दिले होते.

 

विविध बहाण्यांनी आरोपींनी पैसे मागणे सुरू  ठेवल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने बोरिवली पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

 

साहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल कुंभार यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांचा थांगपत्ता शोधून काढला. साहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार, पूनम काळे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश शिवरकर यांच्या पथकाने सापळा रचून दिल्लीतून नायजेरियन नागरिकाला अटक केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून १७ डेबिट कार्ड, १० बँक पासबुक, चार सिम कार्ड आणि दोन आंतरराष्ट्रीय सिम कार्ड हस्तगत केले. प्राथमिक तपासात त्यांची पाच ते सहा जणांची टोळी असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Protected Content