* चाळीसगाव – लाईव्ह न्युज प्रतिनिधी* | शहरातून अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला पोलिसांनी आज पकडले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी चालकाला अटक करून ट्रॅक्टरासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील डेराबर्डी कडून शहराकडे येणाऱ्या एका विना नंबरच्या ट्रॅक्टरवर पोलिसाचा संशय आला. तेव्हा कर्तव्यावरील शहर पोलिसांनी ट्रॅक्टरला थांबवून कसून चौकशी केली. त्यावेळी ट्रॉलीत ७ हजार रुपये किंमतीची सव्वा ब्रास गौन खनिज (वाळू) मिळून आला. त्यावर शहर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा महेंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, ५० हजार रुपये किमतीचे एक तपकिरी रंगाची ट्रॉली व ७ हजार रूपये कि.ची वाळू असे एकूण ४ लाख ७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, १२ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पोलिसांनी केली. या कारवाईमुळे वाळू तस्करी करणाऱ्यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. निखिल सुनील कुढे (वय-२३) रा. एम.जे.नगर, चाळीसगाव असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. तत्पूर्वी पोकॉ विजय रमेश पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात भादवी कलम-३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना भुषण पाटील हे करीत आहेत.