वार्षिक गरजेनुसार कोळसा आयात करून साठवून ठेवा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा –  राज्यात तसेच देशभरात उन्हाळ्याच्या दिवसात विजेची मागणी वाढतीच आहे. परंतु वीजमागणी वाढत असताना कोळसा टंचाईमुळे देशातील वीजनिर्मिती करणाऱ्या औष्णिक प्रकल्पांच्या वीजनिर्मितीवर परिणाम होत आहे. याची दखल घेत वार्षिक गरजेनुसार किमान १० टक्के कोळसा आयात करून तो पावसाळय़ापूर्वी साठवून ठेवण्याच्या सूचना केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी राज्यांना दिल्या आहेत.

देशातील बहुतांश राज्यांच्या वीजप्रकल्पांना कोळसा टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आयात कोळसा वापरून वीजनिर्मिती वाढवण्यासह पावसाळय़ातील कोळसा टंचाईचा सामना करण्यासाठी वार्षिक गरजेच्या १० टक्के आयात कोळसा वापरावा. त्यासाठी कोळसा खरेदी प्रक्रिया सुरू करून पावसाळय़ाआधी आवश्यक प्रमाणात कोळशाचा साठा करून ठेवावा, अशा सूचना केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी दिल्या. वीजप्रकल्पांना कोळशाची वाहतूक करण्यात रेल्वेच्या उपलब्धतेमुळे अडचण असल्यास जवळच्या वीजप्रकल्पांना राज्यांनी आपल्या कोळशापैकी कमाल २५ टक्के कोळसा द्यावा व त्या प्रकल्पांतून वीजनिर्मिती करून त्या राज्यानी न्यावी, असेही केंद्रीय ऊर्जामंत्री सिंह यांनी म्हटले आहे.

कोल इंडियाकडे पाठपुराव्याचा आदेश
राज्यातील वीजपरिस्थिती व कोळसा टंचाईचा आढावा घेत कोळसा पुरवठा आणि रेल्वेच्या उपलब्धतेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना महानिर्मितीला केल्या. तसेच राज्याच्या विज परिस्थिती आणि भारनियमनसंदर्भात नागरिकांना माहिती देण्यात यावी, चुकीची आकडेवारी दिली जाऊ नये यासाठीदेखील यंत्रणा तयार करावी, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

Protected Content