वाढत्या महत्त्वामुळे चीनची भारताविषयी प्रतिस्पर्धी असल्याची भावना

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । ‘जगातील भारताच्या वाढत्या महत्त्वामुळे चीनच्या मनामध्ये भारताविषयी प्रतिस्पर्धी असल्याची भावना आहे. अमेरिका आणि मित्रदेशांबरोबरील भारताचे संबंध मर्यादित ठेवावेत, अशी चीनची इच्छा आहे,’ असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या एका अहवालामध्ये म्हटले आहे.

अमेरिकेचे जगातील आघाडीचे सत्तास्थान हटवून चीनला अमेरिकेची जागा घ्यायची आहे, असेही अहवालात म्हटले आहे. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने नव्या सत्तास्पर्धेला तोंड फोडले आहे, याची जाणीव अमेरिका आणि जगभरातील इतर देशांना होत आहे, यावर अहवालात भर देण्यात आला आहे.

अमेरिकेमध्ये ट्रम्प आणि बायडन यांच्यातील सत्तासंघर्षाच्या काळातच अमेरिकेच्या धोरणाविषयीचा हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. प्रादेशिक पातळीवर चीन विविध देशांचे सुरक्षा, स्वायत्तता आणि आर्थिक हितसंबंध नजरेआड करतो, असा आरोप अहवालात करण्यात आला आहे.या अहवालात म्हटले आहे, ‘चीनच्या मनामध्ये भारत प्रतिस्पर्धी असल्याची भावना आहे. आर्थिकदृष्ट्या गुंतवणूक करून चीनच्या महत्त्वाकांक्षा लादण्याची आणि अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर लोकशाहीवादी देशांशी संबंध मर्यादित ठेवण्याची चीनची इच्छा आहे. आसिआन देश, पॅसिफिक क्षेत्रातील देशांचे सुरक्षा, स्वायत्तता आणि आर्थिक हितसंबंध चीनसाठी गौण आहेत.’

‘चीनमधील कम्युनिस्ट पक्ष केवळ जगभरातील स्वतंत्र-सार्वभौम राष्ट्र-राज्यांच्या प्रस्थापित व्यवस्थेला, ज्या तत्त्वांवर अमेरिकेची स्थापना झाली, त्याला आव्हान देत नसून, जागतिक सत्तेची उतरंड चीनला मूलभूत पातळीवरच बदलायची आहे. चीनला मध्यवर्ती सत्ताकेंद्री ठेवून हुकूमशाही, एकाधिकारशाहीची महत्त्वाकांक्षा आणि वर्चस्ववादी उद्दिष्टे चीनला पूर्ण करायची आहेत. चीनच्या या आव्हानांचा सामना करताना अमेरिकेने स्वातंत्र्याचे संरक्षण करायलाच हवे.’

Protected Content