नवी दिल्ली: वृत्तसंस्था । वर्षभरापासून मी परीक्षेची तयारी करत आहे. मी दिवसाला १२ तास अभ्यास करत होते. त्यामुळेच मी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सातत्य महत्त्वाचे आहे, असं अंजली बिर्ला यांनी आज स्पष्ट केलं .
अंजली यांच्या मोठ्या बहिणीने चार्टड अकाऊंटची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. माझी बहीणच माझा मुख्य आधार आहे. तिनेच मला आयएएसच्या परीक्षेसाठी तयार केलं, असंही त्यांनी सांगितलं.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या अंजली बिर्ला यांची यूपीएससीसाठी निवड झाली आहे. यूपीएससीची परीक्षा न देताच अंजली यांना आयएएस करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा मुद्दा गाजतोय मात्र, अंजली यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रोल करणाऱ्यांनाही त्यांनी चांगलेच फैलावर घेतलं आहे.
अंजली बिर्ला यांनी एका मुलाखतीत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. काही दिवसांपासून सोशल मीडियावरून ट्रोलिंग सुरू असल्याने या ट्रोलिंगविरोधातही कायदा असावा, अशी मागणी अंजली यांनी केली आहे. अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना शोधलं पाहिजे आणि त्यांना जबाबदार धरून शिक्षा केली पाहिजे. आज मी बळी ठरले, उद्या आणखी कोणी तरी बळी ठरेल, असंही त्या म्हणाल्या.
अंजली यांनी पहिल्याच प्रयत्नात तीन टेस्ट परीक्षांमध्ये यश मिळवलं आहे. यूपीएससीने २०१९ साठी जारी केलेल्या गुणवत्ता यादीत त्यांचं नाव आहे. मात्र, अंजली या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा फायदा मिळाला असून मागच्या दाराने यूपीएससीसाठी त्यांची निवड करण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियातून होत आहे.
यूपीएससीचा एवढा अभ्यास करून परीक्षा दिल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल, याचं मला आश्चर्य वाटतं. पण या प्रकरणाने मला आणखीनच कणखर बनवलं आहे. पुढे भविष्यातही मला अशाच प्रकारांना सामोरे जावं लागेल याचा धडा मला याप्रकारातून मिळाला आहे. या प्रकरणामुळे एक व्यक्ती म्हणून मला अधिकच परिपक्व केलं आहे, असंही त्या म्हणाल्या.
मी माझ्याशी नेहमीच प्रामाणिक राहिले आहे. माझ्या आप्तेष्टांना मी किती मेहनत घेतलीय हे माहीत आहे, असंही त्या म्हणाल्या. संपूर्ण वर्षभरात यूपीएससीची परीक्षा तीन टप्प्यात होते. तुम्ही या तिन्ही परीक्षांमध्ये पास झाला तरच सनदी अधिकारी बनता. यूपीएससी सीएसईची परीक्षा अत्यंत पारदर्शीपणे होते. तिथे मागच्या दाराने प्रवेशाचा प्रश्नच नसतो. किमान या संस्थेचा तरी आदर राखा, असं आवाहन त्यांनी ट्विटमधून केलं आहे. एवढंच नव्हे तर अंजली यांनी त्यांच्या तिन्ही परीक्षेची कागदपत्रेही सार्वजनिक केली आहेत.