भुसावळ प्रतिनिधी । एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांनी मंजूर करण्यात आलेले तालुक्यातील हतनूर-वरणगाव येथील राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र हे अहमदनगर जिल्ह्यातील कुडसगाव येथे हलविण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील पुन्हा एक महत्वाचा प्रकल्प दुसरीकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले होते. तथापि, राज्य शासनाच्या गृह विभागाने आज जीआर काढून संबंधीत केंद्र हे अहमदनगर जिल्ह्यातील कुडसगाव येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रोजेक्ट हे एक तर रद्द करण्यात आलेत. तर काही दुसरीकडे हलविले जात आहेत. नाथाभाऊंनी प्रयत्नपूर्वक जिल्ह्यात मंजूर केलेले हे केंद्र देखील आता नगर जिल्ह्यात शिफ्ट करण्यात येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.