वनोली येथील श्री साईबाबा मंदिरातील महाप्रसाद, भंडाऱ्याचा कार्यक्रम रद्द

यावल,  प्रतिनिधी |  तालुक्यातील  वनोली येथील श्री साईबाबा देवस्थान येथे कोरोनाचे संकट पाहता  दि. १४ ऑक्टोबर रोजीचा महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे  मंदिराचे विश्वस्त यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी तसेच या गावचे सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी कळविले आहे.

 

यावल तालुक्यातील हे गाव भुसावळ फैजपूर रस्त्यावरील पाडळसे व बामनोद गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असून याठिकाणी शंभू महादेवाचे पिंडीची स्थापना व नंदादीप श्री साईबाबांच्या हस्ते लावण्यात आले होते. ते आजही तेवत (जळत ) आहेत. एकीकडे दुष्काळ पडला त्यावेळी मंदिरात दिव्यांमध्ये तेल नव्हते.  दुष्काळ पडला होता साईबाबा महाराजांनी उघड्या डोळ्यांनी हे पाहिले त्यावेळी  अक्षरशः साईबाबांनी  दिव्यांमध्ये पाणी टाकून दिवा लावलेला दिसला असे गावकरी  सांगतात.  ५६५ वर्षापासुन याठिकाणी हे नंदादीप आजही ही जळतांना दिसत आहे. अष्टमीच्या दिवशी दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यासह  महाराष्ट्रभरातून व देशातील कानाकोपऱ्यातील भाविक प्रसादासाठी याठिकाणी येतात. आतापर्यंत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून साईबाबा मंदिराच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने हातभार लागला. महाप्रसादासाठी व भाविकांसाठी थांबण्यासाठी आणि सभामंडपाचे काम तसेच बामनोद ते वनोली कोसगाव पाडळसा हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नव्हे तर मोर नदीच्या फुलांवर नदीला पूर आल्यामुळे भाविकांना येता येत नव्हते म्हणून कोसगाव वनोली येथे नद्यांमध्ये पूल बांधण्यात आले. याठिकाणी पूर्वी गावांमध्ये हे महाप्रसादासाठी खूप गर्दी व्हायची. त्यामुळे गावाच्या बाहेर जो विकास झालेला आहे तो युतीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने झालेला दिसतो.

भोजन कक्षासाठी टेकड्यांचे सपाटीकरण, भक्तनिवास, चौफेर कंपाऊंड संरक्षण भिंत यासाठी करोडो रुपयांचा निधी खऱ्या अर्थानं यावल कृपा माजी सभापती हिरालाल चौधरी यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागला.  जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पत्रीशेडसाठी जिल्हा नियोजन मधून अनुदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असून लवकरच याबाबत तशी घोषणा ते करणार आहेत. याठिकाणी राजकारणविरहित काम चालतं.   सर्वपक्षीय  कार्यकर्ते परिसरातील या ठिकाणी   येतात व दानही देतात.  घटस्थापनेच्या दिवशी विधीवत पूजा करून घटस्थापनेपासून येथील परिसरातील नागरीक कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वतःला वाहून घेतात. अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच आश्‍विन शुद्ध अष्टमी यावर्षी गुरुवार दि. १४ ऑक्टोबर  रोजी येत असल्याने महापूजा करण्यात येणार आहे.  कोविडचे संकट लक्षात घेता यावर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.  तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी  असे आवाहन करण्यात आले आहे.  भाविकांनी महाप्रसाद या वर्षी रद्द असल्यामुळे रात्री कोणीही गर्दी करू नये. या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक आणि पोलीस  बंदोबस्त ठेवण्यात आला आहे असे यावल तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा  मंदिराचे ट्रस्टी  हिरालाल व्‍यंकट चौधरी व या गावचे सरपंच प्रकाश हिरालाल चौधरी व ग्रामपंचायत सदस्य व संचालक मंडळ आणि वनोली ग्रामस्थ यांनी केले आहे.

Protected Content