पाचोरा, प्रतिनिधी । शेती करतांना पारंपरिक पिकांना लागणारा खर्च, मजुरांची वाढती टंचाई व निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यावर सुबाभुळ लागवड हा चांगला उपाय (पर्याय) ठरला आहे. तालुक्यातील लोहटार येथील प्रगतशील शेतकरी विजय वाणी यांनी १०० एकर पैकी ३० एकर शेत जमिनीवर सुबाभुळ लागवड केली आहे.
तर उर्वरित क्षेञात त्यांनी केळी, लिंबू, हळद, कांदा, गहू, मोसंबी, मका, पपई, आदी पिकांची लागवड केली आहे. ३० एकर जमिनीवर सुबाभुळ लागवड केली असुन आज हे पिक कापणीवर आले आहे. सोनगड (गुजरात) येथील पेपर मिलशी करार केला आहे. त्यानुसार पहिला कटिंग केलेला माल हा ३ हजार ६०० रुपये टन या दराप्रमाणे करार केलेला आहे. तर दुसरी कटिंग चा माल हा ३ हजार २०० रुपये टन या दराप्रमाणे करार केलेला आहे. करार नुसार दराने पेपर मिल हा सुबाभुळ खरेदी करणार आहे. ३ हजार ६०० रुपये चा भाव पकडला तर त्यांना एका हेक्टर क्षेत्रात तीन लाख साठ हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. कंपनीने त्यांच्या ४ कापण्यांचा करार केलेला आहे.
अशी केली लागवड
प्रारंभी कंपनीने २५० रुपये किलो दराप्रमाणे बी दिले. शेत नांगरणी करुन तयार केले व लागवड ही ठिबक सिंचन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला. ५ × २.५० ( पाच बाय अडीच) या अंतराने बी रोवले. पुढे पावसाळा सुरू झाल्यावर ठिबक सिंचनाचे पाणी बंद केले. दोन वर्षात केवळ लहान असताना एक ते दोन वेळा सुपर आणि पोटॅश खते दिली आहे. त्यानंतर या पिकाला कोणत्याही खतांची माञा देण्याचे काम उरले नाही. पुढे गरजे नुसार पाणी दिले. आज हे पिक १६ महिन्यांचे झाले आहे. प्रत्येक झाडाच्या स्टम्पची जाडी ५ ते १० इंचापर्यत पोहोचले आहे.तर उंची तब्बल ३० ते ३५ फुटापर्यत वाढली आहे. झाडे वाढली की झाडांच्या सावलीमुळे शेतात गवत उगवत नाही व कोणतीही प्रकारची कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरजच भासली नाही.
असे आहे सुबाभुळ पिकाचे अर्थशास्त्र
कंपनीशी ३ हजार ६०० रुपये टन या दराप्रमाणे करार केलेला आहे १ हेक्टर क्षेत्रात लगवड केली आहे एका झाडाचे सरासरी वजन २० ते २५ किलो पकडले तर १५० टन लाकूड मिळु शकते व ३ हजार ६०० रुपये टन या दराप्रमाणे भावात ३ लाख ६० हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. १० वर्षांत चार कापण्या होणार आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/428938674881538