खेडी येथे विविध विकासकामांचे आ. गुलाबराव पाटलांच्या हस्ते भुमिपुजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी या गावी आज माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे भूमीपुजन करण्यात आले.

खेडी गावात चांगल्या प्रकारे एकजुट असून येथील लोकप्रतिनिधी सातत्याने विकासकामांचा पाठपुरावा करत असतात. यामुळे येथील कामे वेगाने मार्गी लागली आहेत. यातूनच आज ५५ लाखांच्या विकासकामांना प्रारंभ झाला असून ८६ लाखांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच खेडी फाटा ते ममुराबाद आणि खेडी फाटा ते वडनगरी या रस्त्यांचे डांबरीकरण देखील लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही आ. पाटील यांनी दिली. तालुक्यातील खेडी येथे विकासकामांच्या भूमिपुजनाप्रसंगी ते बोलत होते.

यात मूलभूत सुविधेअंतर्गत  २० लक्ष रूपयांचे  कॉंक्रीटीकरण, २५ लक्ष रूपयांचे पेव्हिंग ब्लॉक बसविणे व डीपीडिसी अंतर्गत जनासुविधे मधून स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरण करणे १० लक्ष अश्या एकूण  ५५ लाखांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, जलजीवन मिशनच्या अंतर्गत गावासाठी ८६ लाख रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली असून यात ट्युबवेल, जलकुंभ तसेच गावांतर्गत पाईपलाईनचा समावेश देखील आहे. यासोबत, खेडी ते खेडी फाटा रस्त्याचे डांबरीकरण करणे – ५७ लक्ष,  खेडी  ते आव्हाणें रस्त्याचे डांबरीकरण करणे – ५० लक्ष,  खेडी ते आव्हाणें रस्त्यावरील ०/३००  किमीचे कॉंक्रिटीकरण करणे –  ३० लक्ष ,  खेडी ते आव्हाणें रस्त्याच्या दुतर्फा कॉंक्रीट गटार बांधकाम करणे – ३०  लक्ष या कामांना आधीच प्रारंभ करण्यात आला आहे.

कार्यक्रम सुरू होण्याआधी ग्रामस्थांनी काही समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने एस.टी. बस बंद झाल्याने ग्रामस्थ आणि विशेष करून विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आली. यावर आ. गुलाबराव पाटील यांनी एस. टी. खात्याच्या विभागीय नियंत्रकांशी बोलून तातडीने सोमवारपासून बस सुरू करण्याचे निर्देश दिलेत. याशिवाय, विजेच्या समस्येच्या निराकरणासाठी नवीन ट्रान्सफार्मर देण्याचीही आ. पाटील यांनी ग्वाही दिली. आ. गुलाबराव पाटील यांनी गावातील मुख्य चौक ते स्मशानभूमी कॉंक्रीटीकरण करणे १० लाख मंजूर केले. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कैलास चौधरी यांनीकेले. प्रास्ताविकात गावाच्या विकासासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल आ. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. आ. गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत राबविण्यात येणार्‍या हर घर तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रध्वजाचे वितरण करून या अभियानास प्रारंभ केला.

आपल्या मनोगतात आमदार पाटील म्हणाले की, खेडी गावात चांगली एकजुट असून यामुळे गावाच्या विकासाला गती आलेली आहे. तर प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केल्याने गावात सुमारे साडे चार कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी आमदार पाटील म्हणाले की, गिरणा खोर्‍याला नवसंजीवनी प्रदान करण्यासाठी वरदान ठरू शकणार्‍या ७ बलून बंधार्‍यांच्या पर्यावरण खात्याच्या परवानगीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या सहकार्याने ही मंजुरी मिळाल्याने आता गिरणा खोर्‍याचा कायापालट होणार असल्याचा आशावाद आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी गावचे ज्येष्ठ नागरिक पुंडलिक पाटील, सिताराम पाटील,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कैलास चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास सोनवणे,  सरपंच माधुरीताई चौधरी, उपसरपंच आशाबाई सोनवणे,  ग्रामपंचायत सदस्य गोरख सोनवणे,  नारायण सोनवणे , विनायक सोनवणे,  भीमराव सोनवणे,  अतुल सपकाळे,  दिगंबर पाटील, विनायक सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अभिषेक सूर्यवंशी, म. रा.वि.वि.कंपनीचे वानखेडे व सावकारे,  पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एन. डी. ढाके, ग्रामसेवक नरेंद्र साळुंके, नारायण आप्पा सोनवणे, तुरखेडा सरपंच लिलाधर पाटील, आमोदेचे शिवाजी सोनवणे व गावांतील प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार ग्रामसेवक नरेंद्र साळुंके यांनी मानले.

 

Protected Content