लोक संघर्ष मोर्चाच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लोक संघर्ष मोर्चाच्या कार्यालयात लॉक डाउन ची सर्व बंधने पाळत साजरी करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमिताने लोक संघर्ष मोर्चाच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे, दिलीप सपकाळे, प्रितीलाल पवार , प्रा. मिलीद कांबळे हे उपस्थित होते. ह्या वेळी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुदायिक वाचन केले गेले व देशावर नव्हे तर जगावर आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी कटिबध्द असल्याचे नमूद करत  शपथ घेतली गेली. शपथेचा मसुदामध्ये आम्ही आपल्या राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतो. या लाॅकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरीब व गरजू लोकांना तातडीने रोख रकमेचे हस्तांतरण व अन्नवाटप करण्याची मागणी पुढे रेटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आम्ही शपथ घेतो. धर्म, जात, लिंग किंवा अपंगत्व यावर आधारित भेदभावविरहित अशी जनतेची सामाजिक एकजूट मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. लाॅकडाऊनच्या प्रतिबंधांचे पालन करण्याच्या नावाखाली लोकांचे जीवन, स्वातंत्र्य, लोकशाही अधिकारांवर हल्ला किंवा अस्पृश्यतेची अभिव्यक्ती व भेदभाव होता कामा नये याची आम्ही दक्षता घेऊ. “सामाजिक ऐक्यासह शारीरिक अंतर” राखणे ही आपली हाक आहे, “सामाजिक अंतर” राखणे नाही हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू. लोकांना अज्ञान, अंधश्रद्धा आणि पूर्वग्रहांच्या विरुद्ध शिक्षित करण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनापासून प्रेरणा घेऊन आम्ही ही शपथ घेतो की लाॅकडाऊनच्या काळात ज्यांना त्यांचे जीवन आणि रोजीरोटी वाचवण्यासाठी पाठिंब्याची आणि मदतीची गरज आहे त्यांना ती देण्यासाठी पुढाकार घेऊ अशी शपथ घेण्यात आली.

Protected Content