नवी दिल्ली: वृत्तसंस्था । संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. लोकसभेतील गटनेतेपद अधीर रंजन चौधरी यांच्याकडेच ठेवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
काँग्रेसमध्ये लोकसभेतील गटनेता बदलाची जोरदार चर्चा सुरू होती. अधीर रंजन चौधरी यांच्याकडून गटनेतेपद काढून ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे देण्याच्या चर्चा होत्या. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.
पावसाळी अधिवेशनात पक्षाची कामगिरी प्रभावी होण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. हे करताना त्यांनी नेत्यांच्या ज्येष्ठतेचा क्रमही अबाधित ठेवला आहे. अधीर रंजन चौधरी यांच्याकडेच लोकसभेतील गटनेतेपद कायम ठेवण्यात आलं आहे. तर गौरव गोगोईंना त्यांचे डेप्युटी म्हणून नियुक्त केले आहे. के. सुरेश यांना मुख्य प्रतोद करण्यात आलं आहे. रवनीत सिंह बिट्टू आणि मनिकम टागोर हे लोकसभेतील पक्षाचे प्रतोद असतील. शशी थरूर आणि मनिष तिवारी यांनाही या ग्रुपमध्ये सामिल करण्यात आलं आहे.
राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे हे सभागृह नेते असतील. तर आनंद शर्मा हे त्यांचे डेप्युटी असतील. अम्बिका सोनी, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह जयराम रमेश यांना राज्यसभेत मुख्य प्रतोद करण्यात आलं आहे. मी अध्यक्षा म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहातील आपली कामगिरी प्रभावी व्हावी म्हणून फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशन काळात नियुक्त केलेले नेते दररोज एकमेकांना भेटतील आणि संसदेचं कामकाज चांगलं करतील, असं सोनिया गांधी यांनी निर्देशात म्हटलं आहे.
संसदेच्या कामकाजासाठी जे ग्रुप तयार करण्यात आले आहेत, त्यांची बैठक वेळोवेळी घेतली जाणार आहे. मल्लिकार्जुन खरगे हे या बैठकीचे समन्वयक असतील. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी विरोधी पक्षांची आज बैठक होत आहे. या बैठकीत शेतकरी आंदोलन, कृषी कायदा, खासगीकरण, देशद्रोहाच्या कायद्याची वैधता आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार असून याच मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची चिन्हे आहेत.