जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निमखेडी शिवारात खेळतांना एका ५ वर्षीय चिमुकलीचा लोंबकलेल्या विद्यूत तारेला धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धनवी महेंद्र बाविस्कर (वय-५) रा. निमखेडी शिवारातील दत्त मंदीराजवळ, जळगाव असे मयत झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वादळी वारा सुरू आहे, त्यामुळे काही ठिकाणी विद्युत तारा तुटलेले आहेत व काही ठिकाणी लोंबकलेल्या आहेत. जळगाव शहरातील निमखेडी भागात पाच वर्षाची धनवी ही सोमवारी २० मार्च रोजी शेजारी राहणाऱ्या लहान मुलांसोबत गल्लीत खेळत होती. त्यावेळी खेळता खेळता लोंबकलेल्या एका विद्यूत तारेला चिमुकली धनवीचा स्पर्श झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का लागला. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. डॉक्टरांनी मयत घोषीत करताच तिच्या आई-वडील यांनी प्रचंड आक्रोश केला होता. वडील महेंद्र छगन बाविस्कर हे हातमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात तर घरी आई, आजी आणि एक बहीण असा परिवार आहे. या दुदैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.