सावदा, प्रतिनिधी । लातूर येथे निटची तयारी करीत असलेल्या मुलाच्या भेटीला गेलेली येथील आई व तिचा मुलगा असे दोघे मायलेक हे लोकं डाऊन सुरू झाल्यापासून लातुरात अडकले आहेत. या दोघांची लातुरात मोठी गैरसोय होत असून शिवाय गावी सावदा येथे पती, लहान मुलगा व वृध्द सासूबाई आहेत. आजी या आजारी असल्याने अंथरुणाला खिळून आहे. त्यामुळे अश्या दुहेरी संकटाला हे कुटुंब सामोरे जात असून आम्हाला आमच्या गावी जाण्याची शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सावदा येथील संध्या पुरुषोत्तम चौधरी या निटची तयारी करीत असलेल्या मुलगा कपिल यास भेटण्यासाठी महिनाभरापूर्वी लातूर येथे गेल्या. पण कोरोना व्हायरसमुळे लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने त्या लातूरमध्ये अडकल्या आहेत. मोठा मुलगा कपिल नीट परीक्षेच्या क्लासेससाठी लातुरला आहे. मी मुलाला भेटायला गेली व लॉक डाऊन मुळे लातुरात अडकली आहे. आम्हां दोघांचे इथे कोणीही ओळखीचे नाहीत. आमची जेवणाची गैरसोय होत आहे. आमच्या गाव व कुटुंबापासून लांब असल्याने मी व माझा मुलगा खूप मानसिक तणावाखाली आहे. गावी लहान मुलगा व वयोवृद्ध सासू आहे. सासू गुडघा व कमर दुखीमुळे त्रस्त आहेत त्यांना चालता येत नाही. त्या अंथरुणावरच खिळून आहेत. त्यांच्या औषध पाण्याची व लहान मुलाच्या खाण्यापिण्याची गैरसोय होत आहे. पत्नीला गावी परतण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी महिलेचे पती यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक जळगावच्याकडे ऑनलाईन अर्ज केला होता. पण तो रीजेक्ट झाला आहे. तर पुढे आणखी काय परिस्थिती असेल गावी जाता येईल की नाही याची खात्री नसल्याने आमच्या चिंता वाढल्या आहेत असे या कुटुंबाचे म्हणने आहे. मी एक महिला असून शासनाने आम्हांला आमच्या गावी जाण्याची परवानगी दयावी अशी हाक या महिलेने शासनाला दिली आहे.