लॉकडाऊन कालावधीत कोणीही उपाशीपोटी राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील कोणीही नागरीक उपाशी राहू नये, याकरीता जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज आहे. ज्या नागरीकांचा उदरनिर्वाह दैनंदिन कामकाजावरच अवलंबून आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बुडत असल्याने ज्यांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहे. अशा नागरीकांना सामाजिक संस्थांच्या मदतीने फुडपॉकेट देण्याचे नियोजन पुरवठा शाखेने करावे. अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केली.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. याबाबत जिल्ह्यातील सद्यस्थिती व त्यावर करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, रेल्वे पोलीस फोर्सचे कमांडट बी. पी. कुशवाह, मध्य रेल्वेच्या भुसावळ व जळगाव येथील स्टेशनमास्तर यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ ढाकणे पुढे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात नागरीकांना जीवनावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही यासाठी अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू राहणे आवश्यक आहे. याकरीता सर्व संबंधित विभागाने याचे नियोजन करावे. तसेच यामुळे ज्या गरीब व गरजू नागरीकांचा रोजगार बुडत आहे. त्यांना जेवण मिळणे आवश्यक आहे याकरीता सामाजिक संस्थाची मदत घ्यावी. तसेच शिवभोजन थाळी केंद्रामधून जेवणाचे पॅकेट उपलब्ध करुन देता येतील. सध्या जिल्ह्यात 700 थाळींचे उद्दिष्ट आहे आवश्यकता भासली तर त्यात वाढ करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणाऱ्या वाहनांना पास देण्यासाठी विशेष कक्ष स्थापन

जिल्हाधिकारी म्हणाले की, काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेची वाहने व ॲम्बुलन्समधून माणसांची वाहतुक होत असल्याच्या तक्रारी येत आहे. याबाबत परिवहन व पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणऱ्या वाहनांना परिवहन कार्यालयामार्फत पास देण्यात येत आहे. यासाठी परिवहन कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाचा संपर्क क्रमांक 0257-2261819 असा आहे. ज्यांना कोणाला याबाबत काही अडचण असेल अशा नागरीकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील शेतमाल विक्रीसाठी बाहेर नेणाऱ्या वाहनांना तसेच जीवनावश्यक वस्तु घेऊन जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांना कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये. अन्नधान्याच्या तसेच भाजीपाला, फळे जादा भावाने विक्री होत असल्यास याबाबतची तक्रार जिल्हा पुरवठा शाखेकडे तर औषधांबाबतची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करावी. संबंधित विभागाने आपल्याकडे आलेल्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.

वापरलेल्या मास्कबाबत काळजी घ्यावी

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरीक मास्कचा वापर करीत आहे. परंतु वापरलेले मास्क रस्त्यावर टाकल्याचे दिसून येत आहे. या विषाणूचा संसर्ग लक्षात घेता नागरीकांनी वापरलेले मास्क रस्त्यावर टाकू नये. सदरचे मास्क घंटागाडीतच द्यावे. महानगरपालिकेने त्याची स्वतंत्र विल्हेवाट लावावी. जेणेकरुन त्यापासून नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी घराबाहेर पडतानाच आपले ओळखपत्र गळयात घालावे

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना कोणतीही अडचण निर्माण होवू नये याकरीता जीवनावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. या सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी घराबाहेर पडतानाच आपले ओळखपत्र गळयात अडकवूनच बाहेर पडावे. जेणेकरुन पोलीसांना तपासणी करताना अडचणी येणार नाही.

जीवनावश्यक वस्तुंचे दुकाने सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत उघडी रहाणार

लॉकडाऊन कालावधीत नागरीकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु तातडीने उपलब्ध व्हाव्यात. याकरीता जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही ठिकाणी दुकाने दुपारी बारावाजेनंतर बंद करण्यास सांगण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापुढे अशा तक्रारी येणार नाही याची काळजी संबंधित विभागने घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागास दिल्यात.

Protected Content