जळगाव तुषार वाघुळदे। सध्या कोरोना या महारोगाने चांगलेच ग्रासले आहे .गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वच व्यवहार , बाजारपेठ ठप्प झालीय. लॉकडाऊनमुळे केळीला मागणी मोठ्या प्रमाणात आहे , मात्र केळी मातीमोल भावाने विकली जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बाजार समितीने ठरविलेला भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आधीच कितीतरी कठीण अवस्थेत आणि तग धरून असलेला शेतकरी चिंतेत होता, मात्र आता अजून आर्थिक खाईत हा जगाचा पोशिंदा लोटला गेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने ठरवून दिलेला भाव केळी व्यापाऱ्यांनी केव्हाच धुडकावून लावला आहे. बाजार समितीने ठरवून दिलेल्या भावापेक्षा कमी दराने कोणताही केळी उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांना केळी कमी भावात विक्री करण्यास तयार नसल्याचा निर्णय आज झाला आहे. शेतकऱ्यांनी मोबाईल फोनवरुन पंचवीस ते तीस शेतकऱ्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला. २२ मार्चपासून केळीची कापणी आणि वाहतुकीची चक्रे थांबली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यानं या परिस्थितीचा गैरफायदा केळी व्यापारी घेत आहेत. त्यांच्या मर्जीप्रमाणे दर देण्याचा प्रकार यावल, रावेर, मुक्ताईनगर तसेच भुसावळ तालुका परिसरात बिनदिक्कतपणे सुरू आहे.
केळीचे भाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती दररोज जाहीर करत असते. केळीचे दर 600 रुपये क्विंटल असून व्यापारी मात्र केवळ २०० ते ३०० रुपये या दराने खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झालेले असून यावर उपाय म्हणून आता शेतकऱ्यांकडून एकत्रित लढ्यासाठी सुरुवात झाली आहे. ही न्यायाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. शेतकऱ्यांची एकजूट होणे ही काळाची गरज आहे. नवती ७०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी भावात न देण्याचा निर्णय बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी घेतला आहे. बाजार समितीने ठरवलेला भाव मिळावा अशी किमान अपेक्षा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च आणि केळी कापणी मजुरी अजिबात परवडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. दरम्यान लॉकडाऊन 3/4 दिवसांपासून शिथिल केल्याने जिल्ह्यातील केळीची छत्तीसगड, लखनौ, कानपूर, भोपाळ, काश्मीर, रायपूर, दिल्ली, आंध्रप्रदेश, गुजरात, हरियाणा आदी भागात निर्यात होतानाचे चित्र आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2655589461352584/