जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनमध्ये फिजीकल डिस्टन्सींगसह संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून पार्टी करणार्या उच्चभ्रू सोसायटीमधील महिलांविरूध्द आज गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मेहरूण तलावाच्या परिसरात असणार्या श्रीश्री लेक सिटीमध्ये बुधवारी रात्री महिलांनी किटी पार्टीचे आयोजन केले असून यात लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करण्यात आला असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्थानकाचे निरिक्षक विनायक लोकुरे यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी पोलीस पथकाला रवाना केले. या पथकाला श्रीश्री लेक सिटीमध्ये महिलांच्या पार्टीचे आयोजन करण्याचे आढळून आले. यातील महिलांनी मास्कसह अन्य कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यांनी फिजीकल डिस्टन्सींगचे पालन देखील केलेले नव्हते. तसेच संचारबंदीमुळे जमाव एकत्र येण्याला बंदी असतांनाही याचे उल्लंघन करण्यात आले. यामुळे संबंधीत महिलांविरूध्द एमआयडीसी पोलीस स्थानकात भादंवि कलम १८८ व २६९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सर्व महिला प्रतिष्ठीत घराण्यांमधील असून त्यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करत पार्टी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.