जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गरीब विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाकडून अनुदानातील लॅपटॉप खरेदी करुन देतो अशी थाप मारुन दोघांनी एका महिलेची ८५ हजार रुपयात फसवणूक केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोलाणी मार्केटमध्ये राहणाऱ्या समाजसेविका चित्रलेखा कांतीलाल मालपाणी (वय ३३) यांची फसवणूक झाली आहे. किरण मुरलीधर फेगडे व रोहन महेंद्र फेगडे (दोघे रा. मस्कावद, ता. रावेर) यांनी मे महिन्यात मालपाणी यांना भेटून तीन लॅपटॉप मिळवून देण्याचे आश्वासन दिले. हे लॉपटॉप केंद्र शासनाच्या अनुदानातून कमी किमतीत मिळणार असल्याचे दोघांनी सांगीतले होते. त्यानुसार मालपाणी यांनी ७० टक्के रक्कम म्हणजेच ९५ हजार रुपये दिले होते. पैसे घेऊन देखील दोघे जण लॅपटॉप देत नव्हते. नंतर त्यांनी १० हजार रुपये मालपाणी यांना परत केले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे मालपाणी यांच्या लक्षात आले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय बडगुजर तपास करीत आहेत.