मुंबई : वृत्तसंस्था । फेसबुकवर लाइव्ह आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धुळ्याच्या तरुणाचा आयर्लंड येथील फेसबुकच्या अधिकाऱ्यांमुळे जीव वाचला.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वेळेवर माहिती दिल्याबद्दल आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांचे आभार मानलेत. मुंबई व धुळे पोलिसांनी सतर्कता दाखवत संयुक्तपणे केलेल्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं.
युवक लाइव्ह आत्महत्या करण्याच्या तयारीत असतानाच फेसबुकच्या आयर्लंडयेथील अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला आणि अखेर स्थानिक पोलिसांच्या मदतीने युवकाला वाचवण्यात आलं. यामध्ये मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
“आयर्लंड येथील फेसबुकच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी फेसबुक लाइव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धुळे येथील तरुणाची माहिती मुंबई पोलीस आयुक्त रश्मी करंदीकर यांना फोनद्वारे दिली. करंदीकर यांनी कार्यतत्परतेने पावलं उचलत धुळे पोलिसांच्या मदतीने अवघ्या २५ मिनिटांत सदर २३ वर्षीय युवकाचे प्राण वाचविले. कर्तव्यदक्ष मुंबई व धुळे पोलिसांनी संयुक्तपणे केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे. वेळेवर माहिती देणाऱ्या फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार मानतो”, असं ट्विट देशमुख यांनी केलंय.
ज्ञानेश पाटील (२३) असे या तरुणाचे नाव असून रविवारी रात्री त्याने धुळे येथील निवासस्थानी आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रसंग त्याने फेसबुकद्वारे सर्वदूर पसरेल(फेसबुक लाईव्ह) अशी व्यवस्था केली. ही चित्रफीत फेसबुकच्या आर्यलड येथील अधिकाऱ्यांनी पाहून पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांना कळवले. ज्ञानेशच्या फेसबुक खात्याला जोडलेले तीन मोबाइल क्रमांकही दिले.
नंतर सायबर पोलिसांनी या तरुणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिन्ही मोबाइल बंद होते. करंदीकर यांनी दोन पथके तयार करत या तरुणाचा पत्ता शोधण्यासाठी धडपड सुरू केली. पथकातील सहायक निरीक्षक रवी नाळे यांनी अवघ्या १० मिनिटांत आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणांचे नाव आणि नेमका पत्ता शोधला. हे तपशील करंदीकर यांनी धुळे येथील महानिरीक्षक प्रताप दिघावकर, अधीक्षक पंडित यांना दिले. पुढल्या पाच मिनिटांत धुळे पोलिसांनी ज्ञानेशचे घर गाठले आणि त्याचा जीव वाचवला.
मुंबई सायबर पोलिसांनी नेमकी माहिती दिल्याने जखमी तरुणाला वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देणे शक्य झाले. अन्यथा तरुणाचा जीव वाचविणे अशक्य झाले असते, अशी माहिती धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली.