लाईटींग लावण्यासाठी गेलेल्या तरूणाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घराला लाईटिंग लावण्यासाठी जातो असे सांगून घराच्या वरच्या मजल्यावर गेलेल्या रितेश दिलीप माछरे (वय-२२) या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सिंधी कॉलनीतील जाखनी नगरात गुरुवारी २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जाखनी नगरातील कंजरवाड्यात रितेश माछरे हा तरुण गुरुवारी २० ऑक्टोबर रेाजी रात्री १० वाजता त्याची मोठी मामी विजेता बागडे यांना सोडण्यासाठी रामेश्वर कॉलनीत गेला होता. तेथून १० वाजता परत आल्यावर मोठी वहिणी श्रध्दा जयेश माछरे यांना मी दिवाळीची लाईटींग लावण्यासाठी वरच्या मजल्यावर जातो आहे. जेवणही सोबतच द्या असे सांगून जेवण घेऊन तो वरच्या मजल्यावर गेला. बराच वेळ झाला तरी रितेश लाईटिंग लावून खाली आला नाही. त्यामुळे श्रद्धा या वरच्या मजल्यावर गेल्या असता, त्यांना रितेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील तरुणांनी धाव घेत रितेशला खाली उतरवित तात्काळ खासगी रुग्णालयात हलविले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करत रितेशला मयत घोषीत केले. शुक्रवारी २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content