नवी दिल्ली वृत्तसंस्था । जेव्हा भारतात कोविड १९ वरील लस उपलब्ध होईल तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाला ती लस देण्यात येईल, यातून कोणीही सूटणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लसीच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात लस उपलब्ध होताच सर्वांना ही लस दिली जाईल. कोणालाही वगळण्यात येणार नाही अशी खात्री मी देशाला देतो. भारत सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे आणि लोकांच्या मदतीने बऱ्याच जणांचे जीव वाचले, लॉकडाऊन लागू करण्याचा आणि त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्याचा कालावधी पूर्णपणे योग्य होता असं मोदी म्हणाले.
लस वितरणाची तयारी सध्या भारत सरकारकडून केली जात आहे, जेणेकरून वेळ येताच संपूर्ण देशामध्ये ही लस उपलब्ध होऊ शकेल. सर्व देशवासीयांना लस देण्यासाठी सरकारने सुरुवातीला ५० हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे. एका व्यक्तीला लस देण्यासाठी ३८५ रुपयांपर्यंत खर्च होईल असंही सांगण्यात आलं आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात घोषित केले होते की, सत्तेत आल्यानंतर भाजपा बिहारमधील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देणार आहे. त्यानंतर अनेकांनी भाजपाच्या या घोषणेवर प्रश्चचिन्ह उपस्थित केले. यावरून वादंग निर्माण झाला. विरोधकांनी भाजपाच्या यो घोषणेवर निशाणा साधला. निवडणुकीच्या फायद्यासाठी कोरोनाचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपावर करण्यात आला. मात्र केंद्र सरकार राज्यांना ही लस उपलब्ध करून देईल त्यानंतर भाजपा सरकार राज्य सरकार पातळीवर जनतेसाठी मोफत पुरवेल असं स्पष्टीकरण भाजपानं दिलं होतं.