महाराष्ट्रात आधीपासूनच कंत्राटी शेतीचा कायदा – फडणवीस

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रात आधीच कंत्राटी शेतीचा कायदा असल्याने या विरूध्द आंदोलन करणार का ? असा प्रश्‍न विचारत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज यावरून महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

विधानसभेत फडणवीस म्हणाले की, केंद्राच्या कृषी कायद्याचं बारकाईने विवेचन करताना हा कायदा शेतकरी हिताचाच आहे. तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिलेल्या सूचनांचाच या कृषी कायद्यात समावेश करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राज्यात आधीपासूनच कंत्राटी शेतीचा कायदा अस्तित्वात आहे. त्याविरोधातही तुम्ही आंदोलनं करणार का? असा सवालही त्यांनी केला.

ठाकरे सरकारने सत्तेवर आल्यापासून शेतकर्‍यांना काय दिलं? असा सवाल करतानाच पूरग्रस्त शेतकर्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केवळ तीन हजार रुपयांच्या मदतीचा चेक देण्यात आला. अजितदादा हे योग्य वाटतं का? असं विचारतानाच राजा उदार झाला आणि शेतकर्‍यांच्या हाती भोपळा आला, अशी अवस्था सध्या राज्याची असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेची राज्य सरकारने जरूर चौकशी करावी, आमचा या चौकशीला विरोध नाही. पण जलयुक्त शिवार योजनेमुळे ज्या पाच हजार गावात परिवर्तन झालं त्याची यशोगाथाही मांडा, असं ते म्हणाले. जलयुक्तच्या साडेसातशे तक्रारीची चौकशी करण्यात येणार आहे. आम्हीही चौकशी करणार होतो. तुम्ही करताय ठिक आहे. पण पाच लाख कामं झाली. त्यात फक्त सातशेची चौकशी होणार आहे. ही एका विभागाची कामे नाहीत. ग्रामविकास, कृषी, जलसंधारण विभागाची कामांचाही त्याच्यात समावेश आहे, असंही ते म्हणाले.

Protected Content