मध्यप्रदेशात आज राजकीय घडामोडींचा दिवस

भोपाळ वृत्तसंस्था । मध्यप्रदेशच्या राजकीय क्षेत्रात आज प्रचंड घडामोडी अपेक्षित असून एकीकडे राज्यपालांनी कमलनाथ सरकारला आजच बहुमत सिध्द करण्याचे निर्देश दिले असून दुसरीकडे शिवराजसिंग चौहान यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

कमलनाथ सरकारचे भवितव्य ठरवणारे विधानसभेचे अधिवेशन कोरोनामुळे हे अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित झाले. यामुळे बहुमताची चाचणीदेखील आपोआप पुढे ढकलण्यात आली. तथापि, राज्यपाल लालजी टंडन यांनी संध्याकाळी कमलनाथ सरकारला मंगळवारीच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. राज्यपालांनी दबावातून हा अल्टिमेटम दिल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. आधीच काँग्रेसमध्ये फुट पडल्याने कमलनाथ सरकार संकटात आले असतांना राज्यपालांनी मंगळवारीच बहुमत सिध्द करण्याचे निर्देश देऊन त्यांच्या समोरील अडचणीत वाढ केली आहे.

दरम्यान, सोमवारी बहुमत चाचणी घेण्यात न आल्यामुळे भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. विधानसभेचे कामकाज स्थगित करण्याच्या निर्णयालाही त्यांनी आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. यामुळे एकीकडे मध्यप्रदेशच्या विधानसभेत कमलनाथ यांची सत्वपरीक्षा तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात त्यांच्या विरूध्द याचिकेवर सुनावणी असे दुसरे आव्हान देखील उभे ठाकले आहे.

Protected Content