नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात काही काळापासून लसीकरणाचा वेग मंदावल्याचं चित्र आहे. याच गतीने लसीकरण होत राहिलं तर देशाचं लसीकरणाचं लक्ष्य गाठणं अवघड होणार असल्याचं चित्र आहे.
जुलै महिन्यात १३ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य देशासमोर आहे. मात्र, या महिन्याभरात ९.९४ कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. म्हणजे सरासरी प्रतिदिन ३८.२६ लाख डोस. याच गतीने लसीकरण सुरू राहिलं तर जुलै महिना संपेपर्यंत देशात १२.५ कोटी डोस दिले जातील. जर या महिन्याचं १३ कोटींचं लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर प्रतिदिन सरासरी ६० लाख डोस देणे आवश्यक आहे. मात्र, हा आकडा या महिन्यात केवळ दोन वेळा गाठला आहे.
१८ वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून म्हणजे २१ जूनपासून लसीकरणाचा वेग मंदावल्याचं चित्र आहे. त्याच वेळी जुलै महिन्याच्या १३. ५ कोटी लसीकरणाच्या लक्ष्याची घोषणा करण्यात आली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात लसीच्या साप्ताहिक डोसची संख्या सर्वाधिक म्हणजे ४.८ कोटी होती, मात्र २५ जुलैला संपणाऱ्या आठवड्यामध्ये हे प्रमाण २.८ कोटींवर आलं आहे. मात्र, जुलैपर्यंतच्या २७ आठवड्यांच्या सरासरी प्रमाणापेक्षा हे प्रमाण नक्कीच जास्त आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत २९ हजार ६८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजची आकडेवारी दिलासादायक आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्येतही घट झाली आहे.