लवकरच सुरू होणार खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या पुलाचे काम !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणार्‍या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणार्‍या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील पुलाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

 

यासाठी राज्य सरकारने तब्बल ११५ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता दिली असून यामुळे हजारो नागरिकांचा मोठ्या प्रमाणातील फेरा वाचणार आहे. या पुलाच्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश अर्थात वर्क ऑर्डर प्रदान करण्यात आली असून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक पुलाच्या  कामाला सुरूवात होणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

 

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकर दरम्यान पूल बांधण्याचे आश्‍वासन दिले होते. या अनुषंगाने त्यांनी चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे , माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या सोबत सातत्याने पाठपुरावा सुरू केला. यात संबंधीत पूल हा जलसंपदा व सार्वजनीक बांधकाम या दोन्ही खात्यांनी प्रत्येकी ५० टक्के वाटा उचलावा असा निर्णय झाला होता. यानंतर या कामाला प्रशासकीय मान्यता आणि नंतर तांत्रिक मान्यता मिळून याची निविदा काढण्यात आले. या कंत्राटदाराला १३ जुलै २०२२ रोजी कार्यारंभ आदेश म्हणजेच वर्क ऑर्डर प्रदान करण्यात आली आहे. पावसाळा संपताच या कामाचे विधीवत उदघाटन मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

 

अनेक दशकांपासूनची मागणी

चोपडा-खेडीभोकरी-भोकर-आमोदा-कानळदा-जळगाव हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक-४० या नावाने ओळखला जातो. या रस्त्यावरील किलोमीटर १४/५०० दरम्यान तापी नदी पुलावरील खेडी-भोकर या दोन गावांना जोडणार्‍या पुलाचा प्रश्‍न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबीत होता. परिसरातील हजारो शेतकरी आणि सर्वसामान्य ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. वास्तविक पाहता, खेडी- भोकर ते चोपडा हे अंतर फक्त १५ किलोमीटरचे आहे. मात्र, तापी नदीवरील पुलाअभावी हे अंतर ७० किलोमीटरचे होते. परिणामी शेतकर्‍यांचा व नागरिकांचा वेळ व पैसा देखील खर्च होतो. यात चोपडा मार्गे २४ तर अडावद मार्गे २१ किलोमीटरचा फेरा पडत असतो. शिवाय खेडी भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोरगावले, गाढोदे, करंज, सावखेडा आदी गावातील शेतकर्‍यांना ये- जा करण्यासाठी सध्या दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. हा पूल झाल्यानंतर चोपडा मार्गे शिरपूरला जाणेही सोयीचे होणार आहे. आजवर जानेवारी ते जून या कालावधीत तापी नदीवर उभारण्यात येणार्‍या तात्पुरत्या पुलामुळे थोडी सुविधा होत असली तरी उर्वरित सहा महिने फेरा चुकविता येत नाही. या बाबींचा विचार करता, खेडी-भोकरी आणि भोकर या दोन गावांना जोडणारा पूल तापी नदीवर उभारावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने आता ही मागणी प्रत्यक्षात साकारणार आहे. हा  पूल झाल्यास परिसरातील हजारो ग्रामस्थ व वाहनधारकांचा मनस्ताप दूर होणार असून त्यांना पडणारा फेरा वाचणार आहे. याचा चोपडा, जळगाव व धरणगाव या तीन तालुक्यातील जनतेला लाभ होणार आहे.

 

असा असेल पूल

तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकर दरम्यानचा पूल हा उंच पूल असून याची लांबी तब्बल ६६० मीटर लांब आहे. यात प्रत्येकी ३० मीटरचे २२ गाळे असणार आहेत.सदर पुलाच्या दोन्ही बाजूस सुमारे ६५० मीटर लांबीचे पोहोच रस्ते असतील. दोन्ही बाजूला भराव टिकवून ठेवण्याकरिता बॉक्स रिटर्न व पाईल फाउंडेशनसह रिटेनिंग वॉल असणार आहे. स्टील रेलिंग रोडसाइड फर्निचर व इतर अनुषंगिक बाबींचा यात समावेश आहे. या पुलासाठी भोकरच्या बाजूने ६०० मीटर तर खेडीभोकरीच्या बाजूने ६२४ किलोमीटर लांबीचे पोचरस्ते देखील करण्यात येणार आहेत.

 

अविरत गतीने कामे सुरूच राहणार !

खेडीभोकरी ते भोकरच्या दरम्यानचा पूल हा शेतकरी, प्रवासी आणि एकूणच या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या हजारो नागरिकांना सुविधा प्रदान करणारा ठरणार आहे. यातून मी दिलेल्या एका वचनाची पूर्तता होणार असल्याचा मनस्वी आनंद आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रचंड गतीने कामे सुरूच राहणार आहेत. किंबहुना आधीपेक्षा जास्त वेगाने कामे होणार असून यात सदर पुलाचे मोठे काम मार्गी लागत असल्याची बाब लक्षणीय अशीच आहे.

     – ना. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री

Protected Content