लडाखमध्ये भारताने चीनला धडा शिकवला आहे : मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपल्या देशाकडे डोळे वटारुन पाहणाऱ्यांना भारताने धडा शिकवला आहे. भारतमातेकडे डोळे वर करुन पाहाल तर तुमचे डोळे काढून घेण्याची ताकद आमच्यात आहे, हे भारतीय जवानांनी दाखवून दिले आहे. आपल्या जवानांनी लडाखमध्ये चीनला भारताने करारा जवाब दिला आहे, असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात म्हटले आहे.

 

मोदी पुढे म्हणाले की, भारत मैत्री निभावतो. मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर देणे देखील आम्ही जाणतो, अशा शब्दांत त्यांनी चीनसोबतच्या वाढत्या तणावावर भाष्य केले. शत्रूला प्रत्युत्तर देताना आमचे जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश वंदन करत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ आहे, नतमस्तक आहे, अशा शब्दांत मोदींनी वीरमरण पत्करलेल्या जवानांबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या. देश आत्मनिर्भर होणे हीच शहीद जवानांना खरी श्रद्धांजली आहे. भारतीय जवान शहीद झाल्यावर देशातील अनेक लोकांनी लोकल गोष्टीच खरेदी करण्याचा निश्चय केला आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारत इतर अनेक देशांच्या तुलनेत पुढे होता. त्यावेळी अनेक देश जे त्यावेळी आपल्या मागे होते ते खूप पुढे गेले. मात्र,स्वातंत्र्यानंतर आपल्याला पुढे जाता आले नाही. मात्र, आता भारत आत्मनिर्भरतेसह पुढे जात आहे. यात आपल्या सर्वांचा सहभाग अत्यावश्यक आहे. तुम्ही स्थानिक वस्तू खरेदी कराल आणि त्यासाठी बोलाल तर ती देशाला मजबूत करण्याची भूमिका आहे. ही एकप्रकारे देशसेवाच आहे. प्रत्येक क्षेत्रात देशसेवा करण्यास संधी असते, असे मोदींनी सांगितले. मोदी यावेळी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर, आपल्या पूर्व-अनुभवांचा जेवढा उपयोग करुन घ्यायला हवा होता, तेवढा आपण घेऊ शकलो नाही. आज मात्र, संरक्षण क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, भारत पुढे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहे. भारत स्वयंपूर्णतेच्या दिशेने पावले टाकतो आहे. भारताचा इतिहासच संकटातून तावून-सुलाखून अधिक झळाळून बाहेर पडण्याचा आहे. शेकडो वर्षे, अनेक आक्रमकांनी भारतावर आक्रमणं केलीत, भारताला संकटात लोटलं, लोकांना वाटलं होतं की भारताची संस्कृतीच संपून जाईल.मात्र, या संकटांमधूनही भारत अधिकच भव्य आणि सक्षम होत बाहेर पडला.

Protected Content