लखवीला १५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

लाहोर: वृत्तसंस्था । मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी उर रहमान लखवी याला पाकिस्तान कोर्टाने १५ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

याआधी शनिवारी लखवीला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. लखवीवर दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

 

लखवी हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर असून त्याचे हाफिझ सईदनंतर दहशतवादी संघटनेत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. लखवी मुंबई दहशतवादी हल्लाप्रकरणी २०१५ पासून जामिनावर आहे. त्याला पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी विभागाने अटक केली आहे. पंजाबच्या दहशतवाद विरोधी विभागाने गुप्त माहितीवर आधारित अभियानानंतर प्रतिबंधित संघटना लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जकी उर रहमान लखवी याला दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर त्याला अज्ञात स्थळी नेण्यात आले होते.

या अटकेमागे दहशतवादी फंडिंगच्या विरोधात काम करणारे जागतिक संघटन फायनॅन्शियल अॅक्शन टास्कफोर्सचा दबाव असल्याचेही मानले जात आहे. टेरर फंडिंगच्या विरोधातील पाकिस्तानची कारवाई पुरेशी नसल्याचे एफएटीएफने म्हटले आहे. या संघटनेला ग्रे यादीत ठेवले असल्याचे एफएटीएफने म्हटले आहे. पाकिस्तानने जर दहशतवादी फंडिंगविरोधात कारवाई केली नाही, तर त्याला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. या अंतर्गत पाकिस्तानला अनेक प्रकारच्या वित्तीय प्रतिबंधांना समोरे जावे लागणार आहे.

Protected Content