जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील व आदिवासी परिसरातील जनतेने आपल्या परिसरात जास्तीत जास्त बांबू लागवड केली तर त्यातून रोजगार निर्मिती व आर्थिक सधानता ही प्राप्त होऊ शकते असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाराज ज.पो.वळवी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धडगाव आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बांबू ही वनस्पती कोणत्याही काळात आणि कोणत्याही जमिनीवर उगवते. कमी जागेत अधिक उत्पन्न देणारी ही वनस्पती असून बांबू पासून संसारोपयोगी वस्तूंबरोबरच गृह सजावटीच्या इतर वस्तूही बनविता येतात .मी स्वतः झारखंड या राज्याच्या आदिवासीबहुल भागात तसेच महाराष्ट्रातील पालघर ,नंदुरबार सारख्या आदिवासी भागात भेटी देताना बांबू पासून राख्या तयार झाल्याचेही अनुभवले आहे. याचा अर्थ बांबू पर्यावरण रक्षणाबरोबरच रोजगार निर्मितीसाठीही महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर डॉ . पंकजकुमार नन्नवरे व डॉ.संतोष खिराडे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशनही राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले .
यांचा होता सहभाग
दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उदघाटनप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू पी. पी .पाटील यांनी विद्यापीठाच्यावतीने बांबू मिशन संदर्भात व वेगवेगळ्या उपक्रमाच्या बाबतीत आपली भूमिका मांडली. उदघाटन सत्राच्या वेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पी.पी .माहुलीकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र गोवा विभागीय संचालक कार्तिकेयन, डॉ . अतुल साळुंके, हेमंत वळवी, कुलसचिव बी. व्ही .पवार, डॉ . एच.एम.पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ . वैभव सबनीस यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलसचिव बी. व्ही. पवार यांनी केले .