रेम्डेसिवीर इंजेकशन कोरोनावर प्रभावी नाही

जिनेव्हा: वृत्तसंस्था । कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी रेम्डेसिवीर औषधाचा वापर जगभरात करण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील उपचारा दरम्यानही हे औषध वापरण्यात आले. मात्र ते कोरोनाच्या उपचारावर प्रभावी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, सॉलिडॅरिटी ट्रायलमध्ये रेमडेसिवीर औषधाचा उपचारात फारच कमी प्रभाव दिसून आला. बाधितांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याच्या दिवसातही घट झाली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. गंभीर प्रकृती असलेल्या बाधितांचे प्राण वाचवण्यासाठीही हे औषध प्रभावी ठरले नसल्याचे आढळून आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, सॉलिडॅरिटी चाचणीच्या दरम्यान चार औषधांची चाचणी करण्यात आली. चारही औषधे बाधितांच्या उपचारासाठी अनेक देशांमध्ये वापरण्यात येत आहेत. या चाचणीत रेमडेसिवीरशिवाय हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, अॅण्टी एचआयव्ही ड्रग कॉम्बिनेशन लोपिनावीर-रिटोनावीर आणि इंटरफेरॉन या औषधांची चाचणी करण्यात आली.

जागतिक आरोग्य संघटनेने ३० देशांमधील ११ हजार २६६ वयस्कर रुग्णांवर या औषधांचा कसा परिणाम होतो, याची चाचणी केली. त्यामध्ये ही औषधे कोरोनावर फारसे प्रभावी नाहीत. या औषधांच्या वापरामुळे मृतांच्या संख्येतही घट झाली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की या चाचणी दरम्यान औषधांचा खास परिणाम होत असल्याचे दिसून आले नाही. यातील हाइड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरास आधीच मनाई करण्यात आली होती. जागतिक आरोग्य संघटनेचे हे चाचणी संशोधन लवकरच एका वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित होणार आहे. त्यानंतर या संशोधनाला मान्यता मिळेल.

Protected Content