‘रेड झोन’मधून आलेल्यांकडे एरंडोल पालिकेचे साफ दुर्लक्ष; क्वारंटाईन व्यक्तींचा मुक्तसंचार

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथे सुरत, मालेगाव, मुंबई, पुणे यासारख्या रेड झोनमधून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून त्यांना होम क्वारंटाईन केले असले तरी त्यांचा शहरात मुक्तसंचार सुरू असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एरंडोल नगरपालिकेने याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून स्वच्छता करण्यात पालिका कुचकामी ठरली आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी पुढे आली आहे.

दरम्यान, एरंडोलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणावर वाढण्याची शक्यता अनेकांकडून वर्तविण्यात येत आहे. एरंडोल नगरपालिकेने स्वच्छता मोहिम, जनजागृती तसेच विविध परिसरात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत दुर्लक्ष करत असून पालिकेबाबत नागरिकांचा रोष आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा शिरकाव शहरात झाल्यास यास जबाबदार कोण ? असा सवाल सुज्ञ नागरिकांमधून करण्यात येत आहे .

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले असून शासनस्तरावर युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तथापी शासनाने लॉकडाऊन काळात बाहेरगावी अडकून पडलेल्या मजूर, कामगार यांना आपल्यामुळे गांवी येण्याची परवानगी दिल्याने सुरत, मालेगाव, मुंबई, पुणे यासारख्या रेड झोनमधून असंख्य लोक मुळगांवी आले आहेत. त्यांना तपासणीनंतर रुग्णालयातून होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांना आपापल्या घरात राहणे बंधनकारक असताना सुध्दा त्यांचा शहरात नातेवाईक, शेजारीपाजारी , मित्रपरिवार यांच्याकडे मुक्तपणे संचार सुरू आहे . परिणामी शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिका प्रशासन, तहसलिदार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे गरज आहे. नगरपालिका प्रशासन ढिम्म असल्याचे अनेक सुशिक्षित नागरिकांनी बोलून दाखविले. एरंडोल शहर कोरोनाग्रस्त तर होणार नाही ना, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

वास्तविक होम क्वारंटाईन केलेल्यांची माहिती नगरपालिका, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांच्याकडे असते. मात्र संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतू यामुळे भविष्यात कदाचित कोरोनाचा शहरामध्ये शिरकाव झाल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न सुज्ञ नाकरिकांमधून विचारला जात आहे.

Protected Content