पुणे प्रतिनिधी । गत दोन वर्षांपासून स्थिर असणारे रेडी रेकनरचे दर कायम राहतील असे संकेत देतांनाच जिथे किंमती कमी झाल्यात तिथे हे दर कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिली.
येथे बोलतांना महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, रेडीरेकनर दरामध्ये वाढ होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यात वाढ झालेली नाही. अर्थात, या वेळी आम्ही ते कायम ठेवू असे नाही. काही बदल होतील, मात्र ज्या ठिकाणी किमती कमी झाल्या असतील तर रेडीरेकनर ही कमी करता येईल का हा आमचा प्रयत्न आहे. गौण खनिज उत्खनन, मुद्रांक शुल्क तसेच बांधकाम व्यावसायिकांचे अन्य प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व बांधकाम व्यावसायिकांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, अशी माहिती सुध्दा त्यांनी दिली.