जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रिंगरोड येथील बँक ऑफ बडोदा येथील एटीएम मशीन अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना सुमारास घडली आहे. ही घटना व चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रिंगरोडवर बँक ऑफ बडोदा या बॅकेची एटीएम मशीन लावण्यात आले आहे. बाजूलाच बँकेची शाखा देखील आहे. बुधवारी १५ मार्च रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एक अज्ञात चोरटा एटीएम मशीनच्या कॅबीनमध्ये शिरला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्ही व्हिडीओ नुसार, त्याने सुरूवातीला एटीएम मशीनच्यामागील बाजूची पाहणी केली. त्यानंतर समोर बाजूच्या खालचा लॉक असलेला पत्रा हाताने उघडला. त्यानंतर आत असलेले भले मोठे लोखंडाचे एटीएम हाताने तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एटीएम मशीन फोडण्यात अयशस्वी झाल्याने चोरटा घटनास्थळाहून पसार झाला. हा प्रकार गुरूवारी १६ मार्च रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी समाधान पाटील यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळ दाखल झाले. त्यांनी एटीएम मशीन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.