राहुल गांधी-प्रशांत किशोर यांच्यात महत्त्वाची चर्चा; प्रियांका गांधींचाही सहभाग

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । प्रशांत किशोर, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात  २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

पुढील वर्षी पंजाबासह पाच राज्यात विधानसभा निवडणूक होत असून, भाजपासह काँग्रेससाठीही या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. तर पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. ही सगळी चर्चा सुरू असताना राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अचानक राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली. ही भेट पंजाब विधानसभेच्या अनुषंगाने असल्याचं सांगितलं जात होतं.

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा चर्चेत आले. मात्र, त्यांच्या नावाची जास्त चर्चा सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीपासून. शरद पवारांची दोन वेळ भेट घेतल्यानंतर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली.

 

या बैठकीला राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह के.सी. वेणुगोपाल आणि हरिश रावत हे सुद्धा उपस्थित होते. हरिश रावत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असून, सध्या त्यांच्याकडे पंजाब काँग्रेसचा प्रभारी पदभार देण्यात आलेला आहे. या बैठकीत नेत्यांमध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे राजकीय सल्लागार असलेल्या प्रशांत किशोर यांच्यासोबत पंजाब केंद्रीत चर्चा झाल्याचंही वृत्त होतं. मात्र, आता नवीन माहिती समोर आली आहे.

 

या बैठकीत २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०२४ मध्ये भाजपाला पर्याय देण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व विरोधी पक्षांना दुवा साधण्याचं काम सध्या प्रशांत किशोर करत असल्याचं वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबतची बैठकही यानुषंगाने महत्त्वाची मानली जात आहे.

 

Protected Content