राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ग्रंथालयांसाठी असणाऱ्या संधी या विषयावर वेबिनार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ग्रंथालय व ग्रंथपाल यांचे कार्य व संधी” या विषयावर विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत केएकेपी महाविद्यालय, जळगांव यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारचे वैशिष्ठ्य म्हणजे फक्त ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांच्या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरणातील संधी या विषयावर झालेले हे पहिलेच वेबिनार ठरले.

 

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागातील प्रो डॉ राजेंद्र कुंभार उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किशोर पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना संयोजक प्रा हितेश ब्रिजवासी यांनी येवू घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर फक्त ग्रंथपालांना उपुक्त या वेबीनार घेण्यामागची भूमिका मांडली. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांनी शैक्षणिक क्षेत्रात ग्रंथपाल आणि ग्रंथालय यांची गरज स्पष्ट करून नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात हे दोन्ही घटक महत्वाचे आहे असे नमूद केले.

 

 

प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ राजेंद्र कुंभार यांनी नवीन शैक्षणिक धोरणात ग्रंथालय व ग्रंथपाल यांचे कडून नेमकी काय अपेक्षा आहे याची सविस्तर माहिती दिली व त्या नुसार कोणते बदल करणे गरजेचे आहे व यातून रोजगाराच्या विविध संधी कश्या निर्माण होतील यावर प्रकाश टाकला.तसेच बदलत्या काळात ग्रंथपाल हा वाचकांना अपरिहार्य वाटावा म्हणून साऱ्या जीवन कौशल्याचे सार असलेले वाचन कौशल्य ग्रंथपालांनी अधिक वाढवावे असे आग्रही प्रतिपादन केले. तर नवीन शैक्षणिक धोरणात कुठल्या बाबी ह्या उल्लेखनीय असून अजून यात कुठल्या बाबींचा अंतर्भाव ग्रंथालय आणि वाचकांच्या दृष्टीकोनातून असणे आवश्यक आहे असे मुद्दे तयार करून अभ्यासपूर्ण पद्धतीने याचे सादरीकरण केले. या नंतर प्रश्नोत्तरे सत्र घेवून विविध ग्रंथपाल व्यावसायिकांच्या शंकेचे निरसन करण्यात आले होते.या वेबीनारमध्ये देशभरातून ग्रंथालय आणि माहिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दीडशे पेक्षा जास्त प्राध्यापक, ग्रंथपाल आणि संशोधकांनी उपस्थिती दिली. या प्रसंगी पाहुणे परिचय व समारोप ग्रंथपाल प्रा.श्रीराम दाऊतखाने, महिला महाविद्यालय, नंदुरबार यांनी केला तर सूत्र संचालन व आभार ग्रंथपाल आणि आयक्यूएसी समन्वयक श्री हितेश ब्रिजवासी यांनी केले.

 

वेबीनार यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उमेश इंगळे, डॉ.संतोष बडगुजर, डॉ. वैजयंती चौधरी, मुरलीधर चौधरी, आशा पाटील, हितेंद्र सरोदे, सौ. कल्पना पाटील, सुनील बारी, सागर पाटील आदींनी सहकार्य केले तर विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती. शोभाताई पाटील, सचिव राजेंद्र नन्नवरे, के.ए.के.पी महाविद्यालयाचे सचिव विनोद पाटील, प्रशासन अधिकारी दिनेश ठाकरे, प्राचार्य डॉ. किशोर पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content