राष्ट्रवादी वकील सेल जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे यांची उचलबांगडी

शेंदुर्णी प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील निष्ठावंत नेते, कार्यकर्ते व तालुका अध्यक्ष यांचे तक्रारीवरून राष्ट्रवादी वकील सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर बोरसे यांना वकील सेल जिल्हाध्यक्ष पदावरून व पक्षातून राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र भैय्या पाटील यांनी निलंबित केले आहे.

 

जामनेर तालुक्यात नुकतीच वि.का.सोसायटीचे तालुका देखरेख संघ निवडणूक पार पडली. या निवडणूकीत अॅड. ज्ञानेश्वर बोरसे यांनी पक्ष पॅनलकडून फार्म भरलेला असतांनाही याबाबत पक्षाच्या नेत्यांना कुठलीही कल्पना न देता भाजप नेत्यांशी हातमिळवणी करून ऐनवेळी भाजप पॅनलमधून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकून आले. यामूळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पॅनल मधील उमेदवारांचा अल्प मतांनी पराभव होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. पर्यायाने देखरेख संघावर भाजप व राष्ट्रवादी बंडखोर उमेदवारांचे पॅनल निवडून आले आहे. भाजपच्या पॅनल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण ताकदनिशी निवडणूक रिंगणात स्वतंत्र पॅनल उतरले होते. त्यात अॅड. बोरसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने उमेदवारी देण्यात आली होती. सदर निवडणुकीत पक्षांच्या अधिकृत पॅनल ऐवजी पक्ष विरोधी पॅनल मधून उमेदवारी करणे अॅड. ज्ञानेश्वर बोरसे यांना भोवले आहे. जामनेर तालुक्यातील निष्ठावंत नेते ,कार्यकर्ते व तालुका अध्यक्ष यांच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र भैय्या पाटील यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहुन पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पक्षाचे नुकसान होते. त्या विषयी तालुक्यातील निष्ठावंत युवा कार्यकर्ते संतप्त भावना व्यक्त करीत होते. सोशल मीडियावर सुध्दा या विषयी उघड चर्चा झाली आहे.

Protected Content