औरंगाबाद: वृत्तसंस्था । राष्ट्रवादी — राज ठाकरेंच्या वादात राज ठाकरे यांचं म्हणणं पूर्णपणे सत्य आहे, असं प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
आता आधीच मनसे आणि राष्ट्रवादीत जुंपलेली असताना त्यात दरेकरांची एन्ट्री झाल्याने पुन्हा एकदा हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
भाजपच्या यात्रांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. वातावरण भाजपमय झालेलं आहे. राज्यातील आघाडी सरकार भांबावलेलं आहे. लोक नाराज आहेत. संतापलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला प्रतिसाद मिळत आहे, असा दावा दरेकर यांनी केला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसऱ्यांकडे बोट दाखवताना स्वतःखाली काय जळतंय हे यांना दिसत नाही का?, असा सवाल करतानाच हे जेव्हा कार्यक्रम घेतात तेव्हा कोरोना नसतो. नेमका आमच्या वेळी कोरोना होतो का?, असा सवालही त्यांनी केला. जन आशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळत असल्यामुळे आघाडी भयभीत झाली आहे. त्यामुळे हे आरोप होत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
एका प्रश्नावर उत्तर देताना दरेकर यांनी भाजप 24 तास निवडणुकांना समोर जायला तयार असल्याचं स्पष्ट केलं. मनसेसोबत युती करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. तसा विचारही नाही. भाजपसोबत मनसे पदाधिकारी येत असतील तर ती महाराष्ट्राच्या हिताची बाब आहे. मनसे जबाबदार पक्ष आहे, त्यामुळे ही बाब स्वागतार्ह आहे, असं ते म्हणाले.
आपल्याला काही जमत नसलं की केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम आघाडी करत आहे. हा संघर्ष राणे आणि सेना नाही तर हा संघर्ष भाजप आणि सेना आहे. राणे आणि सेना असा संघर्ष रंगवण्याचं काम करू नये, असंही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.