रायगडावरून संभाजीराजे भोसले कडाडले ; मराठा आरक्षणासाठी आता पहिला मोर्चा १६ जूनला

 

 

रायगड : वृत्तसंस्था । आत्तापर्यंत तुम्ही संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन निश्चित आहे”, अशा शब्दांत सरकारला सुनावत १६ जूनला पहिला मोर्चा काढण्याचा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे.

 

 

६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिनापर्यंत मराठा आरक्षणाविषयी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर आम्ही भूमिका जाहीर करू, असा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला होता. त्यामुळे आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे भोसले रायगडावरून काय भूमिका जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे.

 

पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून सामान्य जनतेनं रस्त्यावर येऊ नये, असंदेखील संभाजीराजे म्हणाले. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.

 

“तुम्ही आजपर्यंत संभाजी छत्रपतींना संयमी बघितलं आहे. हो आहे मी संयमी. पण आजपासून तो संयम मी बाजूला ठेवला आहे. खासदार लोकसभेचा पगार घेतात, आमदार विधानसभेचा पगार घेतात. तुमची जबाबदारी आहे ती. पण कुठलाही आमदार पुढे आलेला नाही. तुमची काय जबाबदारी आहे यावर बोला. आत्ताच्या सरकारला हात जोडून विनंती केली. पण तरी काही फरक पडत नाही. पण यापुढे तुम्ही माझा संयम बघूच शकणार नाही. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे”, अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

 

मला सांगायचंय की सध्या तुम्ही रस्त्यावर येऊ नका. पहिली जबाबदारी आमच्या लोकप्रतिनिधींची आहे. शाहू महाराजांच्या समाधीच्या ठिकाणाहून आमचा पहिला मोर्चा होणार आहे. लोकप्रतिनिधींनी सांगायला हवं की सकल मराठा समाजाला तुम्ही कसा न्याय देणार आहात. तेव्हाच बोलायचं. कोविड संपल्यानंतर देखील तु्म्ही ठोस पावलं उचलली नाहीत, तर संभाजीराजांसह संपूर्ण मराठा समाज मुंबईपर्यंत लाँग मार्च करणार. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजी राजेला मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका, एवढंच सांगतो”, असं देखील संभाजीराजे भोसले म्हणाले. येत्या १६ जूनला पहिला मोर्चा काढणार असून कोरोनाचं संकट ओसरल्यानंतर देखील पावलं उचलली गेली नाहीत, तर लाँगमार्च काढला जाईल, यामध्ये लाखो लोक सहभागी होतील, असा इशारा संभाजीराजे भोसले यांनी यावेळी दिला.

 

“२००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला. ज्या सुखाने बहुजन समाज नांदत होता, मराठा समाज नांदत होता, तो आज का नाही. म्हणून मी मराठा समाजासाठी बाहेर पडलो. किती आंदोलनं केले. पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही. तो आर्थिक दुर्बल मध्ये येऊ शकत नाही. म्हणून समाजाला मिळालेलं आरक्षण काढून घेण्यात आलं. त्यामुळे सगळे समाजाचे लोक दु:खी झाले. पण माझा लढा ७० टक्के गरीब मराठ्यांसाठी आहे. आपलेच पुढारी कोण चुकलं-कोण बरोबर या स्पर्धेत लागले. मागच्या सरकारचे लोकं म्हणाले आत्ताच्या सरकराने मांडणी बरोबर केली नाही. आत्ताचं सरकार म्हणतंय तुम्ही कायदा बरोबर केला नाही. मी मोठा की तू मोठा, हेच चाललं आहे. आमची मागणी एकच आहे, आम्हाला न्याय द्या. कोण चुकलं त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही”, अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला.

 

Protected Content