राम मंदिराचे भूमिपूजन आवश्यक, उद्धव ठाकरे अयोध्येला नक्कीच जातील : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) राम मंदिराचे भूमिपूजन आवश्यक आहे. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो आला आहे. अयोध्येचा कार्यक्रम शासकीय आहे. उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येला नक्कीच जातील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगीतले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

 

राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेचे राम मंदिर या विषयाशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नाते आहे. एवढेच नाही तर आज जे भव्य राम मंदिर आणि सोहळा होत आहे त्यातील अडथळे दूर करण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन पुढे गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राम मंदिराची निर्मिती होणार आहे. त्यामुळे राम मंदिराचे भूमिपूजन आवश्यक आहे. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो आला. अयोध्येचा कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे नक्कीच अयोध्येत जातील, असे राऊत म्हणाले. तसेच शरद पवारांनी राम मंदिराविरोधात वक्तव्य केले नाही. केवळ कोरोना नियंत्रणावर भर द्यायला हवे असे म्हटले आहे. हे तिन विचारधारेचे सरकार आहे. त्यामुळे सर्व गोष्टींवर आम्ही सहमत असलोच पाहिजे असे नाही, असेही राऊत म्हणाले.

Protected Content