राम जन्मभूमि ट्रस्ट घोटाळ्याबाबत सरसंघचालकांनी भूमिका स्पष्ट करावी-राऊत

नवी दिल्ली वृत्तसंस्था । अयोध्या येथे उभारण्यात येणार्‍या भव्य श्रीराम मंदिराची जबाबदारी असणार्‍या श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टने वाढी किंमतीत भूखंड खरेदी करून घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केल्याने खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी सरसंघचालकांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

याबाबत वृत्त असे की, राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच २ कोटींचा भूखंड १८ कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप आपतर्फे करण्यात आला आहे. राम मंदिरासाठीच्या भूखंडाचा हा घोटाळा बाहेर आल्याने देशभर एकच खळबळ उडाली  आहे. केवळ दहा मिनिटात ट्रस्टने भूखंडाची किंमत कोट्यवधी कशी केली हा प्रश्‍न विचारला जात आहे. तसेच ट्रस्टने एवढ्या महागड्या भावात भूखंड का खरेदी केला? कशासाठी केला? हा व्यवहार कधी झाला आणि त्याला मंजुरी मिळाली तरी कशी? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. तर ट्रस्टने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

तर या प्रकरणी आता आरोप-प्रत्यारोप सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधीत ट्रस्टच्या घोटाळ्यामुळे देशभरातील हिंदू भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत  यांनी केले. या प्रकरणावर सरसंघचालक मोहन भागवत, विश्‍व हिंदू परिषद आणि ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन खुलासा केले पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

Protected Content