जळगाव प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील एकनाथ नगरात घरफोडी करणाऱ्या तिघापैकी दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीतील एकनाथ नगरात राहणारे सिताराम देला राठोड (वय-४२) यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी ५ मे २०२१ रोजी मध्यरात्री फोडून घरातील ६५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार ६ मे रोजी उघडकीला आला होता. याप्रकरणी सिताराम राठोड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असतांना विशाल मुरलीधर दाभाडे (वय-२०) आणि विशाल किशोर मराठे (वय-२०), आकाश उर्फ आप्या सुनिल नागपुरे तिघे रा. रामेश्वर कॉलनी अशी तीन नावे निष्पन्न झालीत. तिघांपैकी विशाल दाभाडे आणि विशाल मराठे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल शुक्रवारी ३० जुलै रोजी रात्री ११.३० वाजता दोघांना राहत्या घरातून अटक केली. त्यांनी चोरी केलेल्या ६५ हजार रूपयांपैकी २३ हजार रूपये काढून दिले व गुन्ह्याची कबुली दिली. यातील तिसरा संशयित आरोपी आकाश नागपूरे हा फरार आहे. दोघांना आज शनिवार ३१ जुलै रोजी दुपारी जिल्हा सत्र व न्यायालयात हजर केले असता न्या. ए एस शेख यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सरकारतर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले.