जळगाव प्रतिनिधी । लाईट गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एकाच गल्लीतील तिघांच्या घरातून तीन मोबाईल, कपड्यांची बॅगसह रोकड लंपास केल्याची घटना रामेश्वर कॉलनीत आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रत्नाबाई मुरलीधर बैरागी (वय-३८) रा. भगवान किराणा दुकानाजवळ रामेश्वर कॉलनी हे आपल्या कुटुंबासह राहतात. शनिवार ६ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास झोपले. दरम्यान रात्री ११.३० वाजेच्या सुमारास लाईट गेल्याने त्यांनी दरवाजा उघडा ठेवून घरातच झोपले. लाईट गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात ठेवलेला ५ हजार रूपयाचा मोबाईल चोरीस झाल्याचे आढळून आले. दरम्यान आज सकाळी ६ वाजता उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. ते घराबाहेर आल्यावर गल्लीत आल्यावर घराच्या शेजारी राहणारा त्यांचा भाऊ अनिल नारायण बैरागी यांचा मॅक्रोमॅक्स कंपनीचा ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल, कापड्याची बॅग व १ हजार रूपये रोख आणि गल्लीत राहणारे किरण सुपडू कोचुरे यांचा ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरी गेल्याचे समोर आले. रत्नाबाई बैरागी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. महेंद्रसिंग पाटील आणि महेंद्र गायकवाड करीत आहे.